तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
तेरवाड बंधाऱ्याजवळील शिरढोण हद्दीत सुमारे १० ते १२ फूट लांबीची मगर आढळून आल्याने परिसरात घबराट निर्माण झाली. वनविभागाच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर मगर सुरक्षितपणे पकडून ताब्यात घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी काही नागरिकांना बंधाऱ्याजवळ मोठी मगर दिसली. याची माहिती त्यांनी वनविभागाला दिली. वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. मोठ्या शिताफीने आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत ही १२ फूट लांब मगर पकडण्यात यश आले.
या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग होता. मगर जेरबंद झाल्यानंतर तिला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि सुरक्षित ठिकाणी हलवले.
गेल्या काही दिवसांत या भागात मगर दिसल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, वनविभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा प्रकारे वन्यजीव दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा