बेळगाव विधान परिषद निवडणुकीत काॅग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी, अपक्ष लखन जारकीहोळी विजयी
अजित कांबळे/ शिवार न्यूज नेटवर्क :
बेळगाव विधान परिषद निवडणुकीत काॅग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी हे पहिल्या फेरीतच विजयी झाले. त्यांच्यापाठोपाठ अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांचा विजय झाला. भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांचा rपराभव झाला असून या निकालामुळे भाजपला बेळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
बेळगाव जिल्ह्यात विधान परिषदेच्या २ जागांसाठी शुक्रवारी (ता. १०) चुरशीने मतदान झाले. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल्यावर आपलाच उमेदवार निवडून येणार, याबाबत अनेक राजकीय जाणकारांनी आकडेमोडीला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळी (ता. १४) चिक्कोडीतील आर. डी. हायस्कूल येथे मतमोजणीला प्रारंभ झाला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात एकूण ६ उमेदवार होते. त्यातील भाजपचे महांतेश कवटगीमठ, काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी व अपक्ष लखन जारकीहोळी यांच्यातच थेट लढत झाली. आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नेते, कार्यकर्ते व समर्थकांनी कंबर कसली होती. त्यात बाजी कोण मारणार, याचा फैसला आज निवडणूक निकालातून कसा लागेल, याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला होती. पहिल्या फेरीतच काॅंग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांनी बाजी मारली. त्यानंतर अपक्ष उमेदवार लखन जारकिहोळी विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. महांतेश कवटगीमठ यांचा पराभव झाल्याने भाजपच्या गोटात शांतता पसरल्याचे चित्र दिसत होते. एकुणच विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्याने नेते, कार्यकर्ते व अधिकारी वर्गाने सुटकेचा निःस्वास सोडला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा