सर्वसामान्यांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सर्रास वीज कनेक्शन तोडणीमुळे नागरीकांत संताप

 अमोल सुंके/ शिवार न्यूज नेटवर्क :


अकिवाट व परिसरातील वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम महावितरणाकडून युद्धपातळीवर चालू आहे. शेती व घरगुती वीज बिले थकीत असणाऱ्यांचे वीज कनेक्शन बंद केल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर दिसून येत आहे. दोन वर्षे कोरोना आणि त्यानंतर महापूर, यातून आता कुठेतरी सर्वसामान्य जनता सावरत होती, मात्र वीज बिल वसुलीमुळे 'पोटाला खायचे की शेती पिकवण्यासाठी की विज बिल भरायचे ? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करताना दिसत आहेत. 

'विज बिल आत्ताच्या आत्ता भरा नाही तर वीज कनेक्शन बंद करतो' असे म्हणून घराचे व शेतीपंपाचे वीज कनेक्शन महावितरणचे कर्मचारी बंद करून जात आहेत. एकीकडे सर्वसामान्य लोकांचे हजार-दोन हजारांची बिले थकली असली तर लगेच वीज पुरवठा खंडित केला जातो. तर दुसरीकडे बड्या लोकांचे कितीही वीजबिले थकली असली तरी त्यांचे वीज खंडित केले जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. तसेच याचा जाब जर कोणी विचारले तर त्यांना 'तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये जाऊन माहिती घ्या' अशी सूचना वीज कर्मचाऱ्यांकडून केली जाते. यामुळे सर्वसामान्यांचा कोणी वाली आहे की नाही ? असा सवाल सर्वसामान्य जनता करताना दिसत आहेत.

 सध्या शेतीमध्ये उसाच्या भरणीचे दिवस सुरू आहेत अशातच जर शेतीतील वीज बंद केले तर शेतकऱ्यांनी शेती करायची तरी कशी एकीकडे नुकताच महापूर येऊन गेला आहे अशातच अतिवृष्टीमुळे उसाचे पीकदेखील म्हणावे तसे चांगले आले नाही जे आले आहे त्यामध्ये देखील आहे त्या परिस्थितीशी तोंड देत शेतकरी कसेतरी उभा राहण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि अशातच वीज कनेक्शन बंद केले तर शेतकरी जगणार कसा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सुरू असलेला मनमानी कारभार बंद करून महावितरणने तोडलेली वीज कनेक्शन तात्काळ जोडून खंडित वीजपुरवठा पूर्ववत करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलन अंकुशचे रशीद मुल्ला यांनी दिलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष