दत्तवाड येथे शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड (तालुका शिरोळ) येथे महावितरण विद्युत कंपनी कडून वीज ग्राहकांचा वीज बिल दुरुस्ती व इतर तक्रारीसाठी मेळावा घेण्यात आला होता. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.
दत्तवाड येथील रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृह मध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज बिलामध्ये असलेल्या चुकी व इतर समस्याचे निराकरण करण्यासाठी शेतकरी वीज ग्राहकांचा मेळावा बोलावण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने वीज ग्राहक जमले होते.
यावेळी गुरुदत्त शुगर चे संचालक बबन चौगुले म्हणाले, सन २०१६-१७ पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे वीज बिले वेळेत व व्यवस्थित भरली. पण नंतर शेतकऱ्यांच्या लक्षात आले की सर्व वीजबिले खोटी, अन्यायकारक, अवाढव्य, अवास्तव आहेत. तिप्पट चौपट स्वरूपात बिले आकारले जात आहेत. यामध्ये दंड, व्याज, दंडव्याज व इतर अनेक छुपे कर आकारले गेलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज बिले भरली नाहीत. म्हणून थकबाकी पडली आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले. वस्तुनिष्ठ व योग्य बिले द्या आम्ही स्वतः भरू व इतर गावातील शेतकऱ्यांनाही भरायला लावू असे ते म्हणाले.
भाजपा तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील म्हणाले की, दोन वर्ष महापूर दोन वर्षे कोरोना यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांजवळ आता काहीच पैसे नसताना, योजनेची मुदत मार्च २०२२ असताना खोटी अन्यायकारक बिले सक्तीने वसूल करणे अथवा कनेक्शन तोडणे चालू आहे. हे त्वरित थांबून वीज कनेक्शन तोडलेले परत जोडून देणे व आज सर्व शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा वरिष्ठांना पोहचवून योग्य न्याय मिळावा अशी विनंती त्यांनी केली.
शेतकऱ्यांनी MSEB चा अव्वाच्या सव्वा अत्यंत वास्तववादी चुकीच्या बिलाचे पुराव्यानिशी पितळ उघडे पाडले. ही अन्यायकारक कारवाई थांबून शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते आदिनाथ हेमगिरे यांनी दिला. अनेक शेतकरी वीज ग्राहकांनी शेती विद्युत मोटारीचे वीज कनेक्शन तोडले आहे ते त्वरित जोडावे नंतरच आम्ही वीज बिले भरू अशी मागणी केली. वीज मीटर मध्ये वेगळे रीडिंग व प्रत्यक्षात बिलावर वेगळे रीडिंग असल्याची तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा