पुन्हा एकदा कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न
शिवार न्यूज नेटवर्क :
बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा (ता. बेळगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती समोरील भगवा ध्वज हटवून मुर्तीचीही विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे होनगासह परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त ग्रामस्थांसह शिवभक्त मोठ्या संख्येने काकती पोलीस ठाण्यासमोर जमा झाले असून महामार्गावर काही ठिकाणी वाहनावर दगडफेच्या घटनाही घडल्या. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. लागलीच काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली तर हे कृत्य करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्यानंतर बेळगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विटंबना करणार्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवप्रेमींनी संभाजी चौकात धरणे आंदोलन केले होते. तर याचवेळी काही समाजकंटकांनी दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली. मात्र, त्याचे खापर आंदोलनकर्त्यांवर फोडण्यात आले. तसेच त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कृत्याबद्दल बेळगावसह महाराष्ट्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना ताजी असतानाच आज सायंकाळी होनगा येथे तिघा तरुणानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर चढून भगवा ध्वज हटविला तसेच मूर्तीचीही विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मध्यधुंद अवस्थेत असलेले तरुण ग्रामस्थांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काहींनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणांना खाली उतरण्याची सूचना केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा