मिरजेत अखेर पुष्पा झुकला ; अडीच कोटींचे रक्तचंदन पोलिसांनी केली जप्त

 


मिरज / शिवार न्यूज नेटवर्क

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे अडीच कोटी रुपये किंमतींचे लाल रक्तचंदन गांधी चौकी पोलिसांनी जप्त करत एकाला अटक केली आहे. मिरज - कोल्हापूर रस्त्यावर सोमवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. 

गेल्या काही दिवसांपासून रक्तचंदनाच्या तस्करीवर आधारीत 'पुष्पा' चित्रपटाची चर्चा असताना रक्तचंदनाच्या तस्करीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान पुष्पा चित्रपटाची क्रेझ सध्या सुरु असून मिरजेत मात्र ओरिजनल पुष्पा पोलिसांनी जेरबंद केल्याने अखेर पोलिसांसमोर या पुष्पाला झुकावे लागल्याची चर्चा मात्र सुरु आहे.

रक्तचंदनाची बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने त्याला चांगली किंमत आहे. सांगली जिल्ह्यात सोमवारी पहाटे रक्तचंदनाची होणारी तस्करी गांधी चौकी पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडली. 2 कोटी 45 लाख 85 हजार रूपयांचे रक्तचंदन आणि 10 लाख रूपयांचा कर्नाटकातील टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण 2 कोटी 45 लाख 85 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी टेम्पो चालक यासीन इनायतउल्ला खान (रा. अदिग्रहकलहळी, ता.अनीकल जि. बेंगलोर, कर्नाटक) याला अटक केली आहे.

आरोपीने ही चंदनाची लाकडे बेंगलोरच्या शहाबाज नावाच्या व्यक्तीची असल्याचे सांगितले. ही लाकडे कोल्हापुरला नेण्यास सांगितले होते, अशीही माहिती त्याने दिली. या रक्तचंदन तस्करीमधील खर्‍या 'पुष्पा'चा शोध पोलीस घेत आहेत. या रक्तचंदनाचा उपयोग सौंदर्य प्रसाधने, औषधांसाठी व इतर वस्तू बनविण्यासाठी होत असल्याने रक्तचंदनाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. हे रक्तचंदन कर्नाटक व आंध्रप्रदेशच्या सीमेलगतच मिळते. त्यामुळे रक्तचंदनाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. अशा प्रकारच्या तस्करीवरच 'पुष्पा' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

रक्तचंदनाची कर्नाटकातून मिरजमार्गे कोल्हापूर येथे तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना व वनविभागास मिळाली होती. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याचे पथक तसेच वनक्षेत्रपाल यांचेसह कोल्हापूर रोड जकात नाका येथे थांबले होते. वाहनांची तपासणी करत असताना मिरज रेल्वेउड्डाणपूलाच्या दिशेने एक टेम्पो आल्याचे दिसले. त्याला थांबवत टेम्पोची तपासणी केली असता, टेम्पोमध्ये द्राक्षे ठेवण्याचे प्लस्टीक पेट्या समोर होत्या. अधिक तपासणी केली असता त्यामागे रक्तचंदनाच्या लाकडाचे 31 ओंडके ठेवल्याचे पोलिसांना दिसले. याबाबत टेम्पो चालकाला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव यासीन इनायतउल्ला खान असे सांगितले. ही लाकडे रक्तचंदनाची असल्याचेही त्याने सांगितले. ही चंदनाची लाकडे बेंगलोरच्या शहाबाज नावाच्या व्यक्तीच्या मालकीची असल्याचे त्याने सांगितले. ही लाकडे कोल्हापूरला नेण्यास सांगितले होते, अशी माहितीही त्याने दिली. रक्तचंदनाच्या 31 ओंडक्याचे वजन 983 किलो 400 ग्रॅम वजनाचे असून त्याची किंमत एकूण 2 कोटी 45 लाख 85 हजार रूपये आणि 10 लाख रूपयांचा टेम्पो असा एकूण 2 कोटी 55 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल वनक्षेत्रपाल युवराज पाटील व सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी जप्त केला आहे. याबाबत गांधी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम म्हणाले की, गांधी चौकी पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद असून या कारवाईमध्ये सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना विशेष सन्मान मिळण्यासाठी वरिष्ठांकडे शिफारस करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष