शिरोळ तालुक्यात रंगपंचमी उत्साहात साजरी
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
लाल, पिवळा, गुलाबी, निळा अशा रंगांची मुक्त उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग आणि भरलेली पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली बच्चेकंपनी, कुटुंबातील मुले, नातवंडांसोबत रंगून गेलेले आबालवृद्ध, मैत्रीच्या नात्याला रंगांनी अधिक गहिरे करणाऱ्या युवक-युवतींसह अवघा शिरोळ तालुका मंगळवारी रंगात न्हाला यानिमित्ताने तालुक्यातील रस्त्यांनाही वेगळाच रंग चढला होता.
होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमीचीमजा काही औरच असते. लहान मुले तर या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेद विसरायला लावणाऱ्या आणि मनामनातील कटुता आपल्या रंगांनी पुसून टाकणाऱ्या या दिवसाला सुरुवातच झाली बच्चेकंपनीच्या किलबिलाटाने.
सकाळी उठल्या-उठल्या हातात वेगवेगळे रंग घेऊन लहान मुलांनी एकमेकांना रंगवायला सुरुवात केली. दारात ठेवलेल्या बादलीतून पिचकारी भरून मित्र-मैत्रिणींना चिंब भिजवताना त्यांचा होणारा जल्लोष आणि गमती-जमती मोठ्यांनाही हसायला लावणाऱ्या होत्या. त्यांच्यासोबत रंग खेळताना मोठेही लहान झाले आणि मुलांना उत्साह दुणावला होता. रंगपंचमी वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस यंत्रणेसह गृहरक्षक दलाचे जवानांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा