बोरगाव येथे शुक्रवारपासून ज्योतिर्लिंग देवाची यात्रा ; विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
बोरगांव / शिवार न्यूज नेटवर्क :
मौजे बोरगाव ( ता निपाणी ) येथे परमपूज्य शांतानंद महाराज उरुणकर यांच्या आशीर्वादाने व 67 व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या व श्री शांतानंद प्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्योतिर्लिंग देवाची यात्रा व भंडार खाना शुक्रवारी 29 एप्रिल ते रविवार 8 मे पर्यंत आयोजित करण्यात आली आहे, या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.अशी माहिती संयोजकांनी दिली.
श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त शुक्रवार दि 29 एप्रिल रोजी श्री ज्योतिर्लिंग देवाची व परमपूज्य शांतानंद महाराजांची पालखी बैठक महामंडपात होणार आहे, शनिवारी 30 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता श्री ज्योतिर्लिंग देव, श्री यमाई देवी ,श्री काळभैरवनाथ , श्री पशुपतिनाथ, श्री बारा ज्योतिर्लिंग व परमपूज्य शांतानंद महाराज यांच्या मूर्तीस व समाधीस अभिषेक घालण्यात येणार आहे, त्यानंतर श्री ज्योतिर्लिंग देवाची व परमपूज्य शांतानंद महाराजांची पालखी व रथयात्रा काढण्यात येणार आहे, रविवार दि 1 मे रोजी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी श्री रेणुका देवीच्या गाण्याचा कार्यक्रम होणार असून आरळगुंडी येथील तानाजी पाटील देव मामा यांचाही कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दि 2 मे रोजी जनावरांचे मोफत उपचार शिबिर आयोजित केले असून पशुधन विकास अधिकारी डॉ बी बी गुंजाटे, डॉ सागर कुरुंदवाडे, डॉ किरण कबाडे यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
रविवार दि 8 मे रोजी मंदिराचा वास्तुशांती व कलशारोहण समारंभ होत असून सकाळी बाबा ढंगवलीना गलेफ व कलश मिरवणूक तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, यानिमित्ताने विविध करमणुकीचे कार्यक्रम होत आहेत, तेव्हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य श्री शांतानंद प्रसाद महाराज यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा