हेरवाडच्या क्रांतिकारी निर्णयाची शरद पवारांनी घेतली दखल
शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार
सातारा / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायतीने गावसभेत विधवा प्रथेवर बंदी आणून राज्यात क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी घेऊन लोकनियुक्त सरपंच सुरगोंडा पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सातारा येथे सत्कार केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरदचंद्र पवार म्हणाले, हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करून एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, अशा निर्णयाच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील व हा कायदा अंमलात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, समाजामध्ये परंपरागत विधवा महिलांसाठी असलेली प्रथा हेरवाडकरांनी मोडीत काढून राज्यातच नव्हे तर देशात आदर्श निर्माण केला आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये अशा प्रकारचा ठराव करून आपल्या गावांमध्ये विधवा महिलांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावी. दरम्यान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व मंत्रिमंडळातील अन्य मंत्रीमहोदयांना सोबत घेऊन हा कायदा अंमलात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार श्रीनिवास पाटील राज्यातील व मंत्रिमंडळातील वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या सह सातारा परिसरातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. या सत्कार प्रसंगी हेरवाडचे ग्रामपंचायत सदस्य सुकुमार पाटील, अमोल कांबळे, मुक्ताबाई पुजारी, पोलिस पाटील रेखा जाधव, तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव माळी, शांताबाई तेरवाडे, मंगल देबाजे, कृष्णा पुजारी, सुभाष शिरढोणे, ग्रामविकास अधिकारी पी.आर. कोळेकर, अनिता कांबळे, संभाजी मस्के, संजय पुजारी, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा