स्वप्नपूर्तीसाठी जिद्द, परिश्रम, चिकाटी हवी : गोविंद गावडे
शिवार न्यूज नेटवर्क
आपल्या जीवनातील स्वप्नपूर्तीसाठी, यशासाठी जिद्द, परिश्रम, चिकाटी हवी. ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने मार्गक्रमण करावे. परिस्थिती कोणतीही असो, त्या परिस्थितीशी सामना करा, संघर्ष करा. कारण प्रामाणिक प्रयत्नातून यश निश्चित मिळते, असा विश्वास कला व संस्कृती, क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी खांडोळा महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सवप्रसंगी व्यक्त केला.
व्यासपीठावर मंत्री गोविंद गावडे यांच्यासोबत प्रा. पूर्णकला सामंत, प्रा. आशा गेहलोत, प्रा. सिताराम खठणकर, शिक्षण सचिव रवी धवन, सावन गावकर उपस्थित होते. कार्यक्रमांचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले.
श्री. गावडे पुढे म्हणाले, आजचे जग हे स्पर्धेचे आहे. प्रचंड गतीने परिवर्तन होत आहे. या परिस्थितीचे अवलोकन करून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार शिक्षण घेणे आवश्यक आहे. ध्येय निश्चित झाले, की त्यादृष्टीने कार्य करणे, प्रयत्न शक्य आहे. प्रत्येकात नेतृत्वगुण असतात, ते ओळखून त्या त्या क्षेत्रात कार्य करा. शिक्षण घेताना, कार्य करताना संयम, समयसूचकता आवश्यक असून जबाबदारीने आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर यशाची एकेक पायरी गाठायला हवी, पालक, शिक्षकांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे आहे. त्यांचा सन्मानही करायलाच हवा. तसेच आपले जीवन सक्षम करण्यासाठी सकारात्मकतेबरोबरच भरपूर वाचनही करा.
शिक्षण सचिव रवी धवन म्हणाले, जीवनात शिक्षणाला महत्त्व असून उत्तम शिक्षणामुळेच माणूस घडतो, त्यातून पिढ्या घडतात, म्हणजेच देशाच्या विकासात शिक्षणाचा मोठा वाटा आहे. २१ व्या शतकात अनेक संधी आहेत, त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवी. आपली कौशल्य वाढवावी. नेमकेपणाने परिश्रम करा.
सूत्रसंचालन कु. अंताव, रेश्मा खोलकर यांनी केले. प्रा. सिताराम सुखठणकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. आशा गेहलोत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पूर्णकला सामंत यांनी अहवाल सादर केला. त्यानंतर प्रा. आसावरी नायक, प्रा. प्रशांत चोडणकर, प्रा. मिथिला भट, प्रा. विशाल अडकईकर यांनी महाविद्यालयातील विविध विभागाच्या यशस्वी कार्याचा परिचय करून दिला. विद्यार्थी प्रतिनिधी सावन गावकर यांनी आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा