हेरवाडमधील चर्मकार समाजाचे निर्णायक पाऊल
विधवा प्रथा बंदची अंमलबजावणी करून पेटविली क्रांतिकारी मशाल
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याच्या क्रांतिकारी निर्णयाचे देशात स्वागत होत असतानाच येथील ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या पुढाकारातून चर्मकार समाजाने विधवा प्रथा बंदच्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. पती मृत झाल्यावर कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे अशा कुप्रथा बंद करून निर्णायक पाऊल उचलल्यामुळे या लढ्याला आणखी बळ मिळाले आहे.
हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला पण तो अंमलात आणणे ही एवढी सोपी गोष्ट नव्हती, मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच सुरगोंडा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व चर्मकार समाजातील पदाधिकारी यांनी याची अंमलबजावणी केली आहे.
हेरवाड येथील विष्णू गायकवाड वय (६० ) हे मयत झाले होते. मात्र या पदाधिकार्यांच्या पुढाकाराने थेट गायकवाड यांच्या घरी जावून विधवा प्रथा बंदबाबत जनजागृती केली महिलांनाही सर्वांच्याबरोबर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, त्यांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे असा प्रकार अशोभनीय आहे. त्यामुळे चर्मकार समाजाने ही प्रथा बंद करुन या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन पदाधिकार्यांनी केली आणि समाजातील पदाधिकार्यांनी कशाचाही विलंब न करता होकार दर्शविला आणि चर्मकार समाजाने विधवा महिला प्रथा बंद करून क्रांतिकारी मशाल पेटविली. या अंमलबजावणी बद्दल या समाजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निर्णय घेणे सोपे असते पण ते अंमलात आणणे म्हणजे खुपच अवघड काम. हेरवाडने विधवा प्रथा बंदचा निर्णय घेतला खरा पण अंमलात आणण्यासाठी सर्वांची जनजागृती करणे महत्वाचे होते. येथील चर्मकार समाजाने खरोखरच पुढे येवून ही कुप्रथा बंद केली आणि क्रांतिकारी निर्णयाची स्मशाल तेवत ठेवली आहे.
- सुरगोंडा पाटील, सरपंच
हेरवाड मधील चर्मकार समाज नेहमीच सामाजिक कार्यात अग्रभागी असतो, हेरवाड गावाने विधवा प्रथा बंदचा घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी चर्मकार समाजाने सर्वप्रथम केली आहे. इतकेच नव्हे तर कावळा शिवणे, मुंडन करणे या गोष्टीला फाटा देऊन रक्षाविर्जन दिनी पसायदान म्हणण्याचा पायंडा पाडून समाजाने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.
- अर्जुन जाधव, सामाजिक कार्यकर्ते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा