निपाणी येथे सासूच्या मदतीने जावयाच्या चोऱ्या; प्रकरणी तिघांना अटक जवळजवळ 7.50 लाखांचा मुद्देमाल जप्त


निरंजन कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क

       सांगली येथील एका जावयाने निपाणीतील सासू आणि दोन सख्खे भाऊ असलेल्या मित्रांच्या मदतीने निपाणी शहरातील स्पेअर पार्ट्स दुकान व घरफोडी करून सुमारे 7.50 लाखांचा ऐवज मुद्देमाल लांबविला होता. या प्रकरणाचा छडा शुक्रवारी निपाणी शहर पोलिसांनी लावला असून जावई, सासू व दोघा भावांपैकी एक अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. जावई निहाल असलम बालेखान (वय 27, रा. मगरमंच कॉलनी, सांगली) सासू रमिजा दस्तगीर मलोडी (वय 50, रा.जुने संभाजीनगर, निपाणी) या दोघांना निपाणी शहर पोलिसांनी अटक केली असून राजेसाब गुलाब नाईकवाडी (वय 38, रा. सोलापूर ता. हुक्केरी) याला बंबलवाड येथील चोरी प्रकरणी चिकोडी पोलिसांनी निपाणी पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर अटक केली असून दादासाब गुलाब नाईकवाडी (वय 36) हा फरार आहे.

          त्या तिघांकडून 3.50 तोळे सोन्याचे दागिने, 3.75 लाखांचे स्पेअर पार्ट व 2 लाखांची कार असा एकूण 7.50 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवघ्या पंधरा दिवसांत या प्रकरणाचा छडा लावल्याने निपाणी पोलिसांचे जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी अभिनंदन केले आहे. 28 मे रोजी उजेब बागवान यांच्या दुचाकी स्पेअरपार्ट दुकानातील 3.75 लाखांचे स्पेअर पार्टस् व साहित्य लंपास करण्यात आले होते. याबाबत शहर पोलिसांत फिर्याद दाखल झाली होती. सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचा उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर यांनी याप्रकरणी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना शुक्रवारी सकाळी संशयित निहाल हा एका कारमधून दुचाकीचे स्पेअर पार्ट व किमती साहित्य विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार पथकाने निहालला थांबवून विचारणा केली.

       सुरूवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पण, पोलिसी खाक्या दाखवताच स्पेअर पार्टचे दुकान तसेच शिरगुप्पी येथील अंगणवाडी शिक्षिका सुनीता बुवा यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने निहाल राजेसाब व रमिजा यांच्याकडून मुद्देमाल व ऐवज जप्त केला. त्यांना सायंकाळी निपाणी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने निहाल व रमिजा यांची हिंडलगा जेलमध्ये रवानगी केली. संशयित निहालने रमिजा यांच्या मदतीने चोरीसाठी राजेसाब दादासाब यांच्या मालकीच्या कारगाडीचा वापर केल्याचे दिसून आले. या कारवर समोरील बाजूस वधू-वर सूचक मंडळ असा कन्नडमध्ये लिहिलेला फलक लावला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष