कुरुंदवाडमधील मंजूर विकासकामे पूर्ण ; काही विकास कामे लवकरच होणार सुरु

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

     कुरुंदवाड पालिकेची निवडणूका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव हे विकासकामांच्या बाबतीत अँक्शन मोडवर आहेत. शहरातील रस्ते,गटारी, हायमस्ट दिवे आदी मंजूर झालेल्या विकासकामांच्या वर्क ऑर्डर दिल्याने ठिकठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत.तर काही कामांना लवकरच सुरवात होणार आहे.

    दरम्यान शहरातील रस्त्यावरून अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या.प्रशासकराज आल्यानंतर मुख्याधिकारी जाधव यांनी रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

        शहरातील रस्ते महापुराच्या पाण्याने खराब झाले होते. खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. काही ठिकाणच्या गटारी हि मोडकळीस आल्याने पाणी तुंबून राहत होते.मुख्याधिकारी जाधव यांनी यासर्व बाबीचा आढावा घेत गेल्या दीड वर्षापासून याचा आराखडा तयार करत पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले होते.

      पालकमंत्री पाटील यांनी रस्ते गटारी दुरुस्तीसाठी अंदाजे 4 ते 5 कोटी रुपयांचा निधी दिला. शहरातील नवबाग रस्ता, बागवान गल्ली रस्ता, माळभाग रस्ता, बाजार पेठ रस्ता, पालिका चौक ते दर्गाह रस्ता, पोलीस स्टेशन रस्ता, शिवतीर्थ रस्ता डांबरीकरण करण्यात आले.शहरातील काही मुख्य चौकात आणि उपनगरात हायमास्ट दिवे मंजूर करण्यात आले आहेत.लवकरच दिवे बसवण्यात येणार आहेत.

      सलगर ते सदलगा या राज्य मार्गाची उंची वाढल्याने पावसाचे पाणी तुंबून राहून शहरातील काही भागात पाणी शिरत आहे.अंतर्गत रस्त्यांची उंची वाढवून पाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात आला असून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असल्याची बांधकाम विभागातून सांगण्यात आले आहे. शहराचा विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून प्रशासक राज चांगल्या पद्धतीने काम करत असल्याने त्यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष