कुरुंदवाड शहरात कोरोनाची भीती ; सरकारी दवाखानाही कुलूपबंद
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याची वार्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था असलेल्या येथील जिल्हा परिषदेचा दवाखाना मात्र शनिवारी दुपारी बंद स्थितीत दिसून आला, सापडलेल्या रुग्णाबाबत माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आमच्या प्रतिनिधीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी संपर्कात येणे टाळल्याने कुरुंदवाडची आरोग्य यंत्रणा ढेपाळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कुरुंदवाड शहरासह परिसरातील नागरीकांच्या आरोग्य सेवेसाठी शहरात जिल्हा परिषद दवाखाना कार्यरत आहे. गेल्या काही वर्षापूर्वी या दवाखान्यातून रुग्णांना कालबाह्य गोळ्या देण्यात आल्या होत्या. तेव्हा पासून हा दवाखाना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना तसेच कुरुंदवाडमधील एका नागरीकाचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याची चर्चा असल्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले असताना शहरातील जिल्हा परिषदेचा दवाखाना बंद अवस्थेत असल्याचे दिसून आल्याने शहरातील आरोग्य यंत्रणा अकार्यक्षम झाल्याची चर्चा शहरात सुरु आहे. दरम्यान, शनिवारी दुपारनंतर आणि रविवारी ओपीडी बंद जरी असली तरी इमर्जन्सीसाठी दवाखाना उघडे ठेवणे गरजेचे असते मात्र कुरुंदवाडमध्ये सदरचा दवाखाना बंद असल्याने वरिष्ठ अधिकारी वर्गाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा