कुरुंदवाडमध्ये स्वाभिमानी आक्रमक
रास्ता रोको करुन शासनाच्या जीआरची केली होळी
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
सन २०१९ मध्ये महापुराचे भरपाई घेतलेल्या नियमित कर्ज भरणाऱ्या ,शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मिळणार नाहीत असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याच्या विरोधात कुरुंदवाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक होवून शासनाच्या जीआरची होळी करून शहरातील शिवतीर्थ जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना अण्णासाहेब चौगुले म्हणाले, प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी जे निकष जाहीर केले आहेत, यामध्ये 2017-18, 2018-19 व 2019-20 या कालावधीत बँक अथवा संस्थेकडून घेतलेले कर्ज पात्र असेल. कोल्हापूर, सांगली, सातार्यासह 13 जिल्ह्यात 2019 मधील पूरस्थितीत पीक कर्ज आणि त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतल्याने, त्यांना दुबार लाभ दिला जाऊ नये, या दोन निकषांमुळे जिल्ह्यातील सुमारे 90 टक्के शेतकरी अपात्र ठरणार आहेत.
यावेळी बोलताना विश्वास बालिघाटे म्हणाले, जिल्ह्यात उसासाठी जे पीक कर्ज घेतले जाते, त्याला 15 महिन्यांची मुदत असते. त्यामुळे सगल तीन वर्षांच्या निकषात हे शेतकरी बसत नाहीत. हे निकष आम्ही मान्य करणार नाही. या योजनेसाठी 10 हजार कोटींची तरतूद केली आहे, त्याला कात्री लावू देणार नसल्याचा इशारा दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आल्याने कुरुंदवाड - नृसिंहवाडी मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी कुरुंदवाड पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
यावेळी माजी सभापती सुवर्णा अपराज, बंडू उमडाळे, योगेश जिवाजे, विशाल चौगुले, अविनाश गुदले, निंगोडा पाटील, बंडू पाटील, रघू नाईक, दिलीप माणगांवे, भूपाल कुंभोजे, ध्रुव रूकडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा