२० हजाराची लाच घेणारा पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
वडिलांविरुध्द दाखल असलेला गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी २० हजाराची लाच घेताना चंदगड पोलीस ठाण्यांतर्गत फाटा पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले. कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, शनिवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई केली.
अमित भागवत पांडे (वय ३४, सध्या रा. पाटणेफाटा, मूळगाव खोतवाडी, ता. हातकणगंले) असे लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, अमित पांडे गेल्या दोनच महिन्यापूर्वी चंदगड पोलीस स्थानकात हजर झाला होता. तक्रारदार व वडिलांविरुध्द असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करावी म्हणून पांडे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामध्ये तडजोड करुन ती रक्कम ४० हजार करण्यात आली.
यातील २० हजाराचा पहिला हप्ता स्वीकारताना आज पांडे यास पाटणे फाटा येथे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, उप अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, संदीप पडवळ, मयूर देसाई व सूरज अपराध यांनी ही कारवाई केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा