हेरवाड ग्रामपंचायतीत परिवर्तन घडविण्यासाठी बैठकांवर बैठका
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी वसंतराव देसाई व दिलीप पाटील यांच्या गटाच्या बैठकांना वेग आला आहे. ही बैठक यशस्वी झाली आणि हे दोन गट एकत्र आले तर सत्ताधारी गटाला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
सत्ताधारी गट केलेली विकासकामे, देशभरात गाजलेला विधवा प्रथा बंदीचा निर्णय या जोरावर निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे समजते. तसेच विधवांच्या मागणीकडे केलेले दुर्लक्ष, विधवा महिलांचा मोर्चा, उपोषण आणि न झालेली विकास कामे हा मुद्दा पुढे आणून विरोधक निवडणूकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर युवा पिढीने जाहीर केलेली उमेदवारीही पॅनेल प्रमुखांना डोकेदुखी ठरणार आहे.
सरपंचपद अनुसूचित जाती (महिला) यासाठी राखीव आहे. सरपंचपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. सत्ताधारी गटाने सरपंच पदासाठी कमालीची गुप्तता पाळली आहे तर विरोधी गटाकडून तीन नांवे चर्चेत आहेत. त्यामुळे सरपंचपदाचे उमेदवार अजून गुलदस्त्यातच ठेवले जात आहे. तसेच नविन पॅनेलची निर्मिती ही नाराज घटक व उमेदवारी डावललेल्या लोकांच्यावर अवलंबून असणार असल्याने शेवटच्या टप्प्यातील चित्र रंगतदार ठरणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा