अनाथांचा नाथ 'गुरुदत्त शुगर्स', माधवराव घाटगे यांचे दातृत्व; शस्त्रक्रियेसाठी लाखाची मदत
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील ज्ञानेश्वर रामचंद्र पवार यांच्या जबड्याच्या शस्त्रक्रियेसाठी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी एक लाख रुपयांची मदत केली.
श्री पवार हे शेती करतात शिवाय ते घरचे कर्ते असल्याने शस्त्रक्रियेसाठी मोठी रक्कम आणायचे कुठून असा प्रश्न कुटुंबियांना पडला होता. कोरोनाच्या काळात घरातील पाच जणांना कोरोनाचे लागण झाली. यावेळीही उपचारासाठी मोठा खर्च झाला होता.
कोरोनानंतर म्यूकरमायकोसिसची लागण झाली आणि यातच जबड्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचा वैद्यकीय निष्कर्ष पुढे आला. पवार यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने श्री घाटगे यांनी त्यांना मदत करावी अशी विनंती संभाजीपूरमधील सामाजिक कार्यकर्ते राजवर्धन चव्हाण यांनी केली होती.
श्री घाटगे यांनी क्षणाचाही विचार न करता पैशाच्या मदतीचा शब्द देत आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधून शस्त्रक्रियेची माहिती घेतली. यानंतर पवार यांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यांचा जबडा पूर्णपणे जर्मन कृत्रिम बनावटीचा बसविण्यात आला असून सध्या त्यांची प्रकृती सुधारली आहे.
श्री घाटगे यांची या मदतीबद्दल पवार कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर श्री घाटगे यांनी मंगळवारी पवार यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी राजवर्धन चव्हाण, दत्त नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने-देशमुख, शिवाजीराव सांगले, ग्रामपंचायत सदस्य शेखर दाइंगडे, महावीर चिपरगे, सुरेखा पवार उपस्थित होते.
खाजगी साखर कारखानदारीत राज्यात आदर्श निर्माण केलेल्या गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून श्री घाटगे यांनी सामाजिक बांधिलकी जपून गरजूंना मदतीचे व्रत जोपासले आहे. महापूर, कोरोना, रक्तदान शिबिर, आवश्यक तेथे कुपनलिका, गोरगरिबांना वैद्यकीय उपचारासाठी मदत, खेळाडूंना मदत असे कार्य सुरू ठेवले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा