संजय घोडावत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
रोटरी आंतरराष्ट्रीय डिस्ट्रिक्ट ३१७० तर्फे अष्टबंधन' परिषदेत सन्मान
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
बेळगावी येथे रविवारी 12 फेब्रुवारी रोजी 64 वी जिल्हास्तरीय रोटरी अष्टबंधन' परिषद पार पडली. यात संजय घोडावत यांना रोटरी आंतररष्ट्रीयचे प्रतिनिधी पीडीजी रोटे वासू यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे, सेक्रेटरी रोटे डॉ कमलाकर आचरेकर, परिषदेचे चेअरमन रोटे अशोक नाईक, मार्गदर्शक अविनाश पोतदार उपस्थित होते.कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन संजय घोडावत यांचा सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन कमलाकर आचरेकर यांनी केले. संजय घोडावत ग्रुप,फाउंडेशन, इंटरनॅशनल स्कूल, युनिव्हर्सिटी च्या माध्यमातून घोडावत यांच्या यशाचा आलेख चढता असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला.
संजय घोडावत फाउंडेशन च्या वतीने कोरोना काळामध्ये कोविड केअर सेंटरची उभारणी करून उत्तम अशा आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या यामध्ये ३७ हजार पाचशे रुग्णांनी येथे उपचार घेतले. फाउंडेशन च्या वतीने माऊली वृद्धाश्रम येथे सुसज्ज अशा निवाऱ्याची सोय करण्यात आली. याचा फायदा वृद्धाश्रमात राहणाऱ्या अनेक ज्येष्ठांना होत आहे. सामाजिक कार्याबरोबरच शाश्वत विकासासाठी तीन लाखांच्या वर वृक्षारोपण करण्यात आले. कोल्हापुर सांगली परिसरातील पूरग्रस्तांना मदतीसाठी संस्थेने वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. या काळात ५ लाख लोकांना अन्नाची पाकिटे वाटण्यात आली.त्यांच्यासाठी फंड उभा करून अन्नपाण्याची सोय करण्यात आली. फाउंडेशन मार्फत आचार्य श्री तुलसी ब्लड बँकेची स्थापना करून अनेक रुग्णांना रक्तदान करून जीवदान दिले आहे. त्याचबरोबर मिरज येथे अंध विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करून त्यांचे आयष्य प्रकाशमय करण्याचे महत्वाचे कार्य फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे. संजय घोडावत ग्रुप मध्ये 10 हजार कामगार काम करतात. तर संजय घोडावत विद्यापीठांमध्ये 16000 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत .या सर्व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येत असल्याचा उल्लेख संयोजकांनी आपल्या भाषणात केला.
यावेळी बोलताना संजय घोडावत यांनी आपला जीवन प्रवास सदस्यांसमोर मांडला. उद्योग व्यवसाय उभा करत असताना कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या आणि त्यावर कशा पद्धतीने आपण मात केली, याबद्दल त्यांनी सांगितले. ते म्हणाले,की आपल्या आयुष्याची बॅलन्स शीट ही आवक पेक्षा जावक वर जास्त अवलंबून असायला हवी. इतरांना जितकी आपण जास्त मदत करू तितके समाधान आपल्या आयुष्यात भेटते. कोणतीही भौतिक गोष्ट आपल्याला आनंद देऊ शकत नाही परंतु इतरांना केलेली मदत ही नेहमी समाधान देते. रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना आपण अष्टो प्रहर मदतीसाठी तत्पर असल्याची हमी दिली.
याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांच्या पेंटिंगचा लिलाव करण्यात आला. हे पेंटिंग संजय घोडावत यांनी 3 लाख 25 हजार रुपयाला घेतले. सी.एस.आर फंडातून ही रक्कम रोटरी तर्फे सामाजिक कार्यासाठी वापरली जाणार असल्याची माहिती घोडावत यांनी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी रोटे मल्लिकार्जुन मदनुर यांनी आभार मानले. या पुरस्काराबद्दल संजय घोडावत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा