अवघे कुरुंदवाड शहर झाले शिवमय
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
“जय भवानी- जय शिवाजी” , “ छत्रपती शिवाजी महाराज कि जय ” चा जयघोष आसमंतात भिरभिरणारे भगवे झेंडे, विद्यार्थ्यांनी घातलेल्या भगव्या टोप्या, लेझीम , झांज व ढोल पथक तसेच हलगी, कैताळ या पारंपारिक वाद्याचा गजर आणि त्यांच्या जोडीला मुलांनी सादर केलेल्या मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, घोड्यावर आरुढ झालेले शिवाजी महाराज, माता जिजाऊ व मावळे केलेले विद्यार्थी आणि उत्साही वातावरण रविवारी शहरात पाहायला मिळाले ! निमित्त होतं शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळेसह संस्थेच्या विविध शाळांच्या वतीने शिवजयंती निमित्त काढलेल्या भव्य शोभायात्रा सोहळ्याचे !! कुरुंदवाड शहरात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
शिवजयंती निमित्त येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा , सीताबाई पटवर्धन हायस्कूल, सौ. विमलादेवी खंडेराव माने कन्या शाळा, कै. डॉ. रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै. जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्या मंदिर , इंग्लिश मेडियम स्कूल यांच्यासह चंद्रकला बालक मंदिर व श्रीमती ताराबाई दुंडाप्पा गवळी बालक मंदिर यांच्या पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थी – विद्यार्थिनिंच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा करण्यात आली.
या शोभायात्रेचे उद्घाटन व पालखीचे पूजन नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह स्वामी दत्तदेव संस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे, कोल्हापूर जिल्हा मराठा संघचे अध्यक्ष महिपतराव बाबर व येथील वीरशैव लिंगायत समाजाचे उपाध्यक्ष व प्रगतशील शेतकरी सुरेश माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सैनिकी शाळेत शिवचरित्रामधील अध्यायांचा वाचनसप्ताह आयोजित करण्यात आला होता . तसेच विद्यार्थ्यांची गडकिल्ले बनविण्याची स्पर्धा घेतली गेली.
शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रा. शरदचंद्र पराडकर, संचालक रविकिरण गायकवाड, सुरेश शेट्टी (उडपी) व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री चंद्रकांत मोरे , भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष पृथ्वीराज यादव , माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजुगडे व नगरसेवक जवाहर पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. नवबाग रोड येथील मराठा महामंडळाच्या कार्यालयासमोर तालुका शिवसेनाप्रमुख वैभव उगळे , मिलिंद गोरे यांनी पालखीला पुष्पहार घालून स्वागत केले.
सजवलेले ट्रॅक्टर ट्रॉली व बैलगाडी मध्ये आकर्षक वेशभूषेमधील विद्यार्थी विद्यार्थिनीसह चौकाचौकात लेझीम व झांज पथकाद्वारे सादर होणारे मर्दानी खेळ व कसरती हे मुख्य आकर्षण असणारी ही भव्य शोभायात्रा पाहण्यासाठी आबालवृद्धांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा