25 तारखेला विरोधकांची पोटदुखी कायमची थांबेल : धनंजय महाडिक यांचा टोला

कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

25 तारखेला विरोधकांची पोटदुखी कायमची थांबेल, असा टोला खा. धनंजय महाडिक यांनी लगावला. मनोरुग्ण पाटलांनी बिनबुडाचे आरोप थांबवावेत. इतर कारखान्यांसोबत तुलना करण्याऐवजी डी. वाय. पाटील साखर कारखान्यासोबत राजाराम कारखान्याची तुम्ही तुलना का करत नाही, असा सवालही खा. महाडिक यांनी केला.

चांगल्या संस्था मोडून खाणं हाच बंटी पाटील यांचा गुणधर्म असल्याची टीकाही खा. महाडिक यांनी केली.सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीची शनिवारी करवीर तालुक्यातील वळिवडे येथे सभा झाली. या सभेला वळिवडे आणि चिंचवाड गावातील सभासदांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी खा. महाडिक यांनी, तुमच्यात हिंमत असती तर तुम्ही काल बिंदू चौकात आला असता. पुतण्याला पुढे करून तुम्ही लपून बसला. तोही वेळेत आला नाही. ज्याने आयुष्यात कधी जोर-बैठका मारल्या नाहीत, तो काल दंड थोपटून दाखवत होता, हाच मोठा विनोद असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.

यावेळी किरण घाटगे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. आमचे सभासदत्व रद्द करण्याचा घाट घालणारे विरोधक आज उजळ माथ्याने मत मागायला येत आहेत, त्यांना लाज कशी वाटत नाही? असा सवाल घाटगे यांनी केला. तानाजी पाटील यांनीही विरोधकांचा समाचार घेतला. सभासद रद्द करून राजाराम कारखाना घ्यायचा विरोधकांचा डाव आम्ही हाणून पाडला आहे. सुडाचे राजकारण करणाऱ्या विरोधकांनी कोल्हापूरचा बिहार करून टाकला आहे; पण आता तुमचे 100 अपराध भरले आहेत, आता राजारामचे सभासद तुम्हाला धडा शिकवतील, अशा शब्दांत तानाजी पाटील यांनी विरोधकांना फटकारले.

यावेळी भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, माजी सरपंच अनिल पंढरे, संजय चौगुले, ग्रा.पं. सदस्या मेघा मोहिते, अनिता पाटील, राधिका मोरे, स्वाती इंगवले, वैजनाथ गुरव, तानाजी पाटील, दिलीप पाटील, दिलीप उलपे, नारायण चव्हाण,' किरण घाटगे, धनपाल पाटील, माजी सरपंच सुदर्शन उपाध्ये, प्रकाश पाटील, शंकर शिपेकर, बाबासाहेब पाटील, बाबासो माणगावे, उदय पाटील, महेश मोरे, विक्रम मोहिते यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष