हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक बोरगांववाडीचा ऐतिहासिक मोहरम..!
लिंगायत वस्तीच्या गावात शेकडो वर्षाची परंपरा कायम
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगांववाडी हे निपाणी तालुक्यातील धार्मिक-संस्कृती जोपासणारे एक छोटेशे गांव आहे.संपूर्ण गांव हे लिंगायत समाजाचे आहे.पण आश्चर्य असं की,याठिकाणी संपूर्ण गावात एकही मुस्लिम बांधव वास्तव्यास नाही.तरीपण इतरत्र केवळ मुस्लिम समाज साजरा करणारा हा मोहरम सण बोरगांववाडी गांवचे लिंगायत धर्मीय लोक मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात.त्यामुळे हा मोहरम सण 24 जुलै ते 29 जुलै अखेर मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
त्यानिमित्त...
बोरगांववाडी हे एक सीमाभागातील दोन हजार लोक वस्तीचे गांव आहे.गावात वारकरी सांप्रदाया बरोबर अध्यात्मिक क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या अधिक आहे.गांव जरी कर्नाटकात असले तरी गावची बोली भाषा मराठी आहे.केवळ भक्ती आणि अमाप श्रद्धा याच्या जोरावर जवळपास पाचशे वर्षापासून परंपरागत मोहरम सण गुण्या गोविंदाने मोठ्या थाटात संपन्न होतो.त्यामुळे बोरगांववाडीचा मोहरम म्हणजे संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात आदर्शवत मानला जात असून कर्नाटक-महाराष्ट्रात लोकप्रिय ठरला आहे.
या मोहरम सणास खाईत कुदळ मारून दि.20 जुलै रोजी प्रारंभ झाला.तेथून पाचव्या दिवशी सकाळी मानकरी सह ग्राम अभिषेक होऊन देवाच्या सवाऱ्या रंगीबेरंगी पोशाखाने सजविल्या गेल्या.त्यारात्री 8 वाजता हे सवारी देव लेजिम निनादात वाजतगाजत गावचावडी मधून मिरवणुकीने भोसले(माने)गादीला प्रथम दर्शनासाठी जातात.तेथून पुन्हा देव गाव चावडी मंदिरात विराजमान होतात.देव बसल्यानंतर पहिल्या दिवशी नालपिर करबल व विश्वनाथ करबल मेलच्या दंगली होतात व रिवायती गायल्या जातात.
दि. 26 जुलै रोजी सातवीच्या कंदुरी केली जाते याचा मान भैराटे घराण्याचा आहे.या दिवसा पासून गावातील भक्त लोक देवाला दंडवत व नैवद्य नारळ चढविण्यास प्रारंभ करतात.28 जुलै खत्तल रात्र मोहरमचा मुख्य दिवस या दिवशी बहुसंख्य भक्त दंडवत चढवितात,दिवसभर तोंडात पाणी न घेता रोजा धरतात,गावाबरोबर बाहेर गावचे भक्तही मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी वाजत गाजत नैवेद्य घेऊन येतात.या दिवशी हे छोटे गाव भक्तिभावाने जनसागरात दणदणलेले दिसते,या मुख्य दिवसाच्या कंदुरीचा मान माने यांच्या घराण्याकडे आहे.शिवाय याच मध्यरात्री अग्निकुंड खाई खेळणे करून देव पाणी घेण्यासाठी,भेटीसाठी मिरवणुकीने फिरविले जातात.दुसऱ्या दिवशी दि.29 रोजी सकाळ पासून गावातील बहुसंख्य पुरुष मंडळी,युवक वर्ग कुणी साडी तर कुणी अन्य वस्त्र परिधान करत,विविध पोशाख धारण करून पारंपारिक भरुड सोंगे काढून यात्रेकरूंचे मनोरंजन व देवाची चाकरी करताना दिसतात.तर सायंकाळी 5 वाजता देव विसर्जनासाठी गाय विहीर मार्गाने रवाना होतात.व अशा या ऐत्याशिक वैशिष्टय पूर्ण मोहरमची सांगता जारत्या नंतर होते. अशी माहिती ढोणेवाडी बोरगाववाडी ग्राम पंचायत अध्यक्षा सौ गीतांजली विजय माने यांनी दिली.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा