नियोजित अकीवाट औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषणकारी प्रकल्प होऊ देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील अकिवाट टाकळी परिसरात शासकीय औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी मागील दोन वर्षापासून मी सातत्याने प्रयत्न केले आहेत, याचाच भाग म्हणून प्रस्तावित केलेल्या औद्योगिक वसाहतीस शासनाच्या उद्योग मंत्रालयाने मान्यता ही दिली आहे, त्या परिसरातील उपलब्ध जागेचे सर्वेक्षण देखील शासनाच्या वतीने झाले असून लवकरच या परिसरातील निवासी अतिक्रमणे कायम ठेवून उरलेल्या क्षेत्रांमध्ये शासकीय औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे, ही वसाहत उभी करत असताना या वसाहतीमधून परिसरातील पाणी, हवा प्रदूषित होईल असा एकही उद्योग होऊ देणार नाही अशी माहिती शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळांला दिली, औद्योगिक वसाहतीमध्ये प्रोसेसिंग युनिट होणार नसल्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, जवळपास 20 हजार युवक,युवती व महिला यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी गारमेंट पार्क व तत्सम उद्योगांना प्राधान्य दिले जाणार असून प्रदूषण निर्माण होणारे प्रकल्प येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल.
या परिसरातील शेतकऱ्यांची मुले उद्योजक व्हावीत, बेरोजगार युवकांच्या हातांना काम मिळावे या हेतूने उभारला जाणारा हा प्रकल्प आदर्शवत असाच राहील, औद्योगिक वसाहती परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारे व परिसरातील वातावरण दूषित करणारे कोणतेही कारखाने या नियोजित औद्योगिक वसाहतीमध्ये येणार नाहीत, आम्ही होऊ देणार नाही, याबाबतची दक्षता आपण घेऊ या परिसरात होणाऱ्या ह्या औद्योगिक वसाहतीमुळे वसाहतीच्या परिसरात अनेक छोटे-मोठे व्यवसाय करणे शक्य होणार आहे, औद्योगिक प्रकल्पांमुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायाला वृद्धी मिळणार असून युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा