दिल्ली दरबारात तीन रंगाचा झेंडा फडकल...

  समान नागरी कायदा होईल, हेरवाडच्या संतुबाई यात्रेत भाकणूक



हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या हेरवाड येथील ग्रामदैवत श्री संतुबाई यात्रेला बुधवारी उत्साहात प्रारंभ करण्यात आला. गुरुवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने यावेळी सिद्धू आरगे, बिरा वाघे, आप्पा आरगे महाराज यांनी भाकणूक कथन केली. 

भाकणूकीत भविष्यवाणी कथन करताना सिद्धू आरगे, बिरा वाघे, आप्पा आरगे महाराज म्हणाले, राजकारणाचं वाटोळ होईल, सहा महिनेच भगवा झेंडा राज्य करंल, दिल्ली दरबारात तिन रंगाचा झेंडा फडकल, कळपातलं बाळ कळपात लढल, पायरीचा धोंडा पायरीला बसेल, देशात समान नागरी कायदा होईल, राजकारण करणाऱ्यांनो जरा जपून चला ; दंगा धोपा होईल, रस भांड उदंड पिकेल, कारखान्याचे बाळ दरवाज्याच्या तोंडाला अश्रु गाळल, सहा महिन्यांनंतर साथ रोग येईल माझ्या (कांबळ्याच्या सावलीत) भक्तीत जो राहिल त्याला मी तारून नेईन, दंगा - धोपा जास्त होईल सांभाळून राव्हा, आई तुमच्या पाठीशी आहे. नऊ खंडात माझं पुराण पुस्तक आहे, समाज, पुजारी, बाळ गोपाळांना मेंढके व भविक भक्तांना व ग्रामस्थांना माझा आशिर्वाद आहे. लेक धनींना माझा आशिर्वाद राहिल. कोकणात मृग रोहिणीचा पाऊस येईल. आंबील माझा मान राहिल. अडद्रा नक्षत्र कुठे होईल कुठे होणार नाही. तरणा - म्हातारा पाऊस सर्वत्र पडेल, असळका पाऊस एक अंग भिजल एक अंग वाळलं राहिल. उत्तरेचा पाऊस जगात संपूर्ण होईल, नासाडी होईल. हादका पावसात सहा महिन्याच्या बाळाच्या पुढ रोगराई होईल डॉक्टर तिथं हात टेकतील. सावीसाती पाऊस एक पुर आणलं. जगाचं धारण - धोरणं बाळाचं पावलाला मरण, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं ; खरं बोलणार उपाशी फिरेल खोटं बोलणारा दहा वेळा जेवण करून त्याच्या दारात बसल, जगात चाललेला वाईट बघून तिन महिन्यात कोकणातली देवी गाडा घेऊन फिरत येईल जिकडे फिरेल, तिकडं संपल. 

कोण बघतील कोण न बघतील पांढरा धान्य भरपूर पिकल मूठभर घराकडे येईल. तंबाखू उदंड पिकल तंबाखूचा लिलाव होईल आणि शेवट फेकून येशीला. तांबडे फुल जगात सोन्यावाणी विकल कोणी लावतील कोण घरला नेतील. गैर हंगामी मेघराजाचा बरसेल. नदीकडचा बाळ माळावर पळून जाईल माळातला बाळ हसत बसेल. अशाप्रकारे महाराजांनी भाकणूक कथन केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष