बालाजीच्या स्नेहल व अक्षताला नॅशनल गेम्समध्ये सुवर्ण पदक
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
भारत सरकार आयोजित ३७ वी नॅशनल गेम्स ही स्पर्धा गोवा येथील मडगाव येथे दिनांक २८ आक्टोबर २०२३ ते २ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत रोलबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी कु. स्नेहल दिपक पाटील व कु. अक्षता अब्दुल शिकलगार यांनी सुवर्ण पटकावून प्रशालेचे नांव राष्ट्रीय पातळीवर चमकवले. या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी कु. स्नेहल पाटील व अक्षता शिकलगार यांना मिळाली.
महाराष्ट्राचा संघ निवड करताना संपूर्ण महाराष्ट्रातून २०० खेळाडू निवड चाचणीसाठी आलेले होते. या स्पर्धकांमधून १२ खेळाडू निवडले गेले, यामध्ये स्नेहल व अक्षताची निवड झाली. नॅशनल गेम्स या स्पर्धेची तयारी म्हणून पुणे येथे सराव घेणेत आला होता.
नॅशनल गेम्स या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने छत्तीसगड, तामिळनाडू, गुजरात, जम्मू, व अंतीम सामन्यात राजस्थानसारख्या बलाढ्य संघाचा १ गुणाने पराभव करुन महाराष्ट्राला सुवर्ण पदक प्राप्त करुन दिले. विजेत्या संघाला रोख रक्कम ७ लाख रुपये शासनाने जाहिर केले आहे. कु.स्नेहल ही इयत्ता ५ वी पासूनची श्री. बालाजी विद्यालयाची विद्यार्थीनी असून तिने आजपर्यंत ३ राष्ट्रीय स्पर्धेत व ४ राज्यस्तरीय स्पर्धेत रोलबॉल खेळामध्ये प्राविण्य पटकावून आपला दबादबा कायम ठेवला आहे. तसेच अक्षता हीने ११वी व १२ वी चे शिक्षण श्री. बालाजी ज्युनियर कॉलेजमधून घेऊन २ राष्ट्रीय व ३ राज्यस्तरीय स्पर्धेत यश प्राप्त केले.
या दोन यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेचे क्रीडाविभागप्रमुख राजेश चौगुले सर, उत्तम मेंगणे सर, रवी चौगुले सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. एम.एस. रावळ मॅडम यांची प्रेरणा मिळाली.
या दोन यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचा संस्थापक अध्यक्ष मा. मदनराव कारंडे साहेब सेक्रेटरी मा. महेश कोळीकाल साहेब, मुख्याध्यापिका सौ. एम.एस. रावळ मॅडम व उपमुख्याध्यापक श्री. डी.वाय. नारायणकर सर यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा