विक्रीकर निरीक्षक परीक्षेत धीरज ढाले राज्यात प्रथम
तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ऑक्टोंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक(सेल टॅक्स इन्स्पेक्टर) मुख्य परीक्षेत धीरज बाळासाहेब ढाले (तेरवाड तालुका शिरोळ )यांने मागासवर्गीयात (अनुसूचित जाती) महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे तसेच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी ही काय कमी नसतो हे दाखवून दिले. यश कुणाची मक्तेदारी नाही प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास आणि जिद्द कायम ठेवल्यास यश निश्चित मिळते हे धीरज याने दाखवून दिले आहे.
तेरवाड गावासारख्या ग्रामीण भागात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या धीरजने विक्रीकर निरीक्षक(सेल टॅक्स इन्स्पेक्टर) परीक्षेत मागासवर्गीयात(अनुसूचित जाती) राज्यात प्रथम येऊन "हम भी किसीसे कम नही" हे धीरजने दाखवून दिले. सुरुवातीपासूनच आपणही शासकीय सेवेत जाऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.स्वप्नाला सत्यात उतरावयाचे असेल तर कठोर परिश्रमाची तयारी करावी लागते याची जाणीव धीरजला सुरुवाती पासून होती आणि याच अधिकारी होण्याच्या ध्येयाने धीरजला झपाटले होते. वडील बाळासाहेब सेवानिवृत्त (बीएसएनएल) ऑपरेटर ,आई मंदाकिनी ढाले गृहिणी यांनी शिक्षणासाठी धीरजला कायम प्रोत्साहन दिले.धीरजचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या कुमार विद्या मंदिर तेरवाड तर माध्यमिक शिक्षण सीताबाई पटवर्धन हायस्कूल कुरुंदवाड येथे झाली पदवीचे (बीई मेकॅनिकल)शिक्षण डीकेटीई इचलकरंजी येथे केली पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भगीरथ आयएएस अकॅडमी पुणे येथे अभ्यास चालू केला.
एक दोन मार्क कमी पडल्याने बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेत यशाने हुलकावणी दिली होती पण अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्नात सातत्य ठेवून यश आपल्या कवेत आणले. अभ्यास करताना अनावश्यक गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून फक्त आपल्या ध्येयावर ठाम राहिला. धीरजला या स्पर्धा परीक्षेसाठी गणेश खताळे (उपजिल्हाधिकारी) अमित कांबळे, गजानन बंडगर, राहुल कांबळे (विक्रीकर निरीक्षक) आई, वडील, राहुल वराळे मामा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा