छत्रपती शिवरायांचे विचार सर्वांनी अंगीकारणे काळाच गरज: स्नेहा देसाई
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा नव्हते ; तर ते युगपुरुष होते. त्यांनी जीवनात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले. प्रजेवर अन्याय करणाऱ्याला धडा शिकवला. शेतक-याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले. पर स्त्रीला मातेसमान मानले. सर्वधर्मसमभाव या न्यायाने वागले त्यामुळे अशा थोर राजांचा विचार सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिरोळ महिला तालुकाध्यक्ष स्नेहा वसंतराव देसाई यांनी केले.
येथील छत्रपती शिवाजी विकास सेवा सोसायटीमध्ये आयोजित शिवजयंती निमित्त त्या बोलत होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी देसाई पुढे म्हणाल्या, स्वाभिमानी आणि अभिमानी मराठे शाहीची पहिली पताका फडकावणारे सरदार शहाजी भोसले व सरदार लखुजी जाधव यांची वीरकन्या आदरणीय जिजामाता यांच्या पोटी एक रत्न जन्माला आले. ते रत्न म्हणजेच छत्रपती शिवाजी राजे भोसले होय.
माता जिजाऊ शिवबाना म्हणत असत की आपण स्वराज्य निर्माण करा. जिजाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले.
त्यांनी गनिमी कावा व दृढ इच्छा शक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले.
यावेळी सरपंच रेखा जाधव, माजी सरपंच वसंतराव देसाई, किरण नाडकर्णी, रावसाहेब शिंदे, सत्याप्पा अकिवाटे, बाबासो माने, रवी इंगळे, शिवाप्पा माने, सचिव जितेंद्र देसाई यांच्यासह सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा