लाच मागितल्याप्रकरणी जयसिंगपूरचा तलाठी जाळ्यात
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
प्लॉटच्या क्षेत्रफळामधील तफावत दूर करण्यासाठी २७ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जयसिंगपूरचा तलाठी स्वप्नील वसंतराव घाटगे (वय ३९, रा. रुकडी, ता. हातकणंगले) व तहसील कार्यालयातील लिपिक शिवाजी नागनाथ इटलावर (वय ३२, सध्या रा. शाहू कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर, मूळ गाव कुंडलवाडी, ता. बिलोली, जि. नांदेड) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. २६) दुपारी अटक केली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील एका तक्रारदाराची जयसिंगपूरमध्ये जमीन आहे. या जमिनीमधील प्लॉटच्या क्षेत्रफळामध्ये तफावत असल्याने क्षेत्रफळाची दुरुस्ती करून नोंद घालावी, तसा सातबारा उतारा मिळावा, यासाठी तक्रारदार यांनी जयसिंगपूरचे तलाठी घाटगे याची भेट घेतली होती. त्यावेळी तलाठ्याने २२ हजार रुपयांची मागणी केली. मात्र हे पैसे शासकीय फी असावी, असे समजून तक्रारदार यांनी ते दिले होते. त्यानंतर कामाकरिता तलाठ्याची पुन्हा भेट घेतली असता पुन्हा ३५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र पूर्वी पैसे दिल्याचे सांगितले असता ते प्रोटोकॉलसाठी होते, असे सांगितल्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. १६ नोव्हेंबर व चार डिसेंबर २०२३ रोजी लाचलुचपत विभागाने पडताळणी केली होती. यामध्ये तलाठी घाटगे याने क्षेत्रफळाची दुरुस्ती करुन उतारा देण्यासाठी २० हजार रुपये तसेच तहसील कार्यालयातील लिपिक इटलावार याच्याकरिता पाच हजार व खासगी टायपिस्टकरिता २५०० रुपये अशी एकूण २७ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. शिवाय तलाठ्याने सांगितल्याप्रमाणे लिपिक इटलावर यानेही पाच हजार रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, कर्मचारी प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, विकास माने, सुधीर पाटील, सचिन पाटील, संदीप पवार, सूरज अपराध, विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा