यंत्रमागधारकांचे नेते विनय महाजन यांचा सत्यजित पाटील यांना पाठींबा
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या 10 वर्षांत यंत्रमागधारकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले असून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर हे प्रश्न समजुन घेऊन ते मार्गी लावतील अशी आशा आहे. त्यामुळे सत्यजित पाटील यांना पाठींबा देत असल्याचे यंत्रमागधारकांचे नेते विनय महाजन यांनी काँग्रेस कमिटीत झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले.
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध समाजबांधव, संघटनांचा पाठींबाही मिळत आहे. एक निष्ठावंत आणि निष्कलंक उमेदवार म्हणून आपल्या सोबत राहणार असल्याची ग्वाहीही नागरीक देत आहेत. आज शहर काँग्रेस कमिटीत झालेल्या कार्यक्रमात यंत्रमागधारकांचे नेते विनय महाजन यांनी स्वत: उपस्थिती लावून सत्यजित पाटील यांना पाठींबा जाहीर केला. यावेळी महाजन म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टी यांना जनतेने संधी दिली तर 2019 च्या निवडणुकीत धैर्यशील माने यांना जनतेने संसदेत पाठवले. या दोन्ही खासदारांकडे मुलभुत प्रश्नांसह वस्त्रोद्योग, यंत्रमाग उद्योगातील प्रश्न सोडवण्यासाठी स्वत: पाठपुरावा केला मात्र दोघांनीही दुर्लक्षच केले. केवळ अनुदान मिळाल्यावर उद्योग, व्यवसाय टिकेल असे नाही. त्यासाठी धोरणात्मक बदल होणे गरजेचे आहे आणि सत्यजित पाटील हे समस्या समजुन घेऊन ते नक्की मार्गी लावतील असा विश्वास वाटतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सत्यजित पाटील यांना पाठींबा जाहीर करून त्यांना विजयी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी सागर चाळके, मदन कारंडे, प्रकाश मोरबाळे, सत्यजित पाटील यांचे बंधू युवराज पाटील यांनी आजी-माजी खासदार निष्क्रीय ठरले असून आता पुन्हा त्यांना संधी दिल्यास जनता समस्यांमध्ये होरपळून निघेल. त्यामुळे आत्ता नाही तर कधीच नाही असा निर्धार करून जनता सत्यजित पाटील यांच्या पाठीशी उभी आहे. यंत्रमागधारकांचे नेते विनय महाजन यांनी पाठींबा दिल्याने आणखी बळ वाढल्याचे सांगितले. यावेळी शशांक बावचकर, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, महेश बोहरा, प्रमोद खुडे, सुरज दुबे, सदा मलाबादे, रविंद्र पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा