शमनेवाडी येथे दंगलप्रकरणी शांतता सभा संपन्न
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
शमणेवाडी (ता.चिक्कोडी) येथे ता 14 रोजी निर्माण झालेला जातीय तणाव निवळण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक भिमाशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदलगा पोलिस ठाण्यासमोरील गणेश मंदिरात शमणेवाडी येथील सर्व समाजाच्या नागरिकांना बोलावून शांतता सभा घेण्यात आली.
ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी चूक ही दोन्ही बाजुने असू शकते पण चुकीची जाणीव करून घेऊन त्यावर तोडगा काढला तरच शांतता सलोखा वाढू शकतो. युवकांनी थोर पुरुषांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहिले पाहिजे तरच समाजामध्ये अशा प्रकारचे तेढ निर्माण होणार नसल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक भिमाशंकर यांनी शांतता सभेला मार्गदर्शन करताना सांगितले . गावच्या हिताच्या दृष्टीने भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी चिक्कोडीचे मंडल पोलिस निरीक्षक काडदेवरू, सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार , गोपाळकृष्ण गौडर यांचेसह आसपासच्या पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी व शमणेवाडीतील सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा