एखाद्या साखर कारखादाराने स्वतःचा ऊस जाळून गाळपास नेला का ? राजू शेट्टींचा सवाल

 


शिरसी / शिवार न्यूज नेटवर्क :

माझ्या विरोधात साखर कारखानदार लोकसभेच्या प्रचारात उतरले आहेत. पण बिले द्यायचे नाव काढत नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस या लोकांनीच वाळवलेला आहे. कारण यांच्याकडे टोळ्या कमी आहेत. तोडणी यंत्रणा कमी आहे. बहुसंख्या टोळ्या पळून गेल्या आहेत. आपल्या बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात. पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ऊस जाळून न्यायला लावतात. एखाद्या साखर कारखानदाराने स्वतःचा ऊस जाळून गाळपास गेलेले एक उदाहरण असेल तर मला द्या. सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांची ऊस जाळून घेऊन गेली आहेत. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. ते शिरसी ता. शिराळा येथील प्रचार सभेत बोलत होते.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, माझ्या वर काही महाभाग टीका करत आहेत की, राजू शेट्टी यांनी आंदोलन केले म्हणून उसाच्या तोडण्या उशीरा सुरू झाल्या. फेब्रुवारी नंतर दरवर्षी साखर कारखानदार ऊस जाळूनच नेतात. त्यात सभासद नसला की टनाला ३०० रूपये कमी करतात. यामधूनही पण शेतकऱ्यांची लूट करत आहेत. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. शेतकऱ्यांनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे. तरच शेतकरी चळवळ टिकणार आहे. आपण देशाला अन्नधान्य पुरवतो. मात्र शेतकरी उपाशीची आहे. शेतीमालाला हमीभाव मिळाल्यास शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील युवकांना रोजगारासाठी मुंबईला जायची गरज भासणार नाही. यासाठी मला एमएसपीचा कायदा मंजूर करून घेण्यासाठी संसदेत जायचे आहे. शिराळा तालुका हा दुर्गम भाग आहे. उसाबरोबरच इतर पिके देखील याठिकाणी घेतली जातात. येथील शेतकऱ्यांची गुंट्याची शेती आहे. शेतीमालाला दर मिळत नाही. शेतकऱ्यांची या अवस्थेला राज्यकर्तेच जबाबदार आहेत. ग्रामीण भागात रोजगार मिळत नाही. मिळतो तो केवळ शेतीमधूनच. त्यासाठी लोकांना पुणे, मुंबईत नोकरीसाठी जावे लागते. शेतीमालाला दर मिळावा म्हणून गेली ३० वर्षे मी संघर्ष करतोय. मी खासदार असताना लोकसभेत दोन अशासकीय विधेयके मांडलेली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अधिकरा २०१८ या दोन विधेयकांना अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. मला संसदेत जाऊन ती विधेयके मंजूर करून घ्यायची आहेत. त्यासाठी मी लागेल ती किंमत मोजायला तयार आहे. यावेळी पोपट मोरे, राम पाटील, अॅड. शमशुद्दीन संदे, मानसिंग पाटील, देवेंद्र धस, संदीप राजोबा, राजू पाटील, रवि पाटील, काका रोकडे, अमोल गुरव कैलास देसाई आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष