शेतीमध्ये योग्य वेळेला योग्य नियोजन केल्यास शेती फायदेशीर : डॉ. सुरेश माने पाटील
शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क :
ऊस शेती करीत असताना कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसे घेता येते याचा अभ्यास शेतकऱ्यांनी स्वतः करणे गरजेचे आहे. आगामी काळात मजुरांचीही कमतरता भासणार असून यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. माती परीक्षण करून घेतल्यानंतर योग्य त्या प्रमाणात आणि अचूक सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खतांचा वापर केल्यास खर्चही कमी येतो. त्याचबरोबर ऊस तोडणी खर्चात बचत करावी लागेल. शेतीमध्ये योग्य वेळेला योग्य नियोजन केल्यास शेती फायदेशीर होऊ शकते, असे मत व्ही. एस. आय. पुण्याचे माजी शास्त्रज्ञ डॉ. सुरेश माने पाटील यांनी व्यक्त केले.
श्री दत्त साखर कारखाना आणि महाधन ॲग्रीटेक लि. पुणे यांच्या वतीने बेडकीहाळ येथे आयोजित केलेल्या ऊस पिक परिसंवादात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अभय पुरंदर खोत हे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. सुरेश माने पाटील यांनी आंतरपीक, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी खते, बियाणांची निवड, स्वतःचा बेणेमळा तयार करणे, उसाच्या जाती, मशागत, हंगाम, सरी सोडणे, यांत्रिकीकरणाची शेती, सुपरकेन नर्सरी, बेणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन, ठिबक सिंचनाचे महत्त्व, तण व्यवस्थापन, आंतरमशागत, फवारणी, ऊस संख्या नियोजन, ड्रोन फवारणी, खोडवा व्यवस्थापन आदी विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
दत्त कारखानाचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, कारखान्याच्या वतीने सेंद्रिय कर्ब वाढीचे मोठे प्रयत्न होत असून त्याला यशही येत आहे. बेडकिहाळ आणि परिसरात जमीन क्षारपड मुक्तीची कामे केल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पन्न वाढू शकते. शुगर बीट घेण्यासारखे प्रयोगही यशस्वी होत आहेत. शेतकऱ्यांनी सर्वांगीण अभ्यास करून शेती करावी. यासाठी कारखान्याकडून सखोल मार्गदर्शन उपलब्ध केले असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. स्वागत श्री दत्त कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील यांनी केले. प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी केले. सूत्रसंचालन संजय सुतार यांनी केले तर आभार ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले यांनी मानले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक शरदचंद्र पाठक, अमर यादव, महाधनचे सुजन मोटे, पासगोंडा पाटील, आप्पासो पाटील, शंकर दादा पाटील, बाळासाहेब पाटील, मलगोंडा पाटील, बाळासो पाटील, प्रदीप पाटील, नाभिराज खोत, महावीर पाटील, संतोष पाटील, अशोक आरगे, सुरेश पाटील, रमेश पाटील, प्रशांत पाटील, श्री देशपांडे यांच्यासह बेडकिहाळ, शमनेवाडी, भोज, भोजवाडी, गळतगा, सदलगा, वडगोल, बोरगाव, चाँद शिरदवाड, जनवाड, कारदगा येथील शेतकरी, तसेच शेती अधिकारी, मदतनीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा