अधिक ऊस उत्पादनासाठी लागण तंत्रज्ञान ते ऊस तोडणीचे निश्चित धोरण ठरवणे फायदेशीर : शास्त्रज्ञ डॉ. सुरेश माने पाटील यांचे मत
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
ऊस शेती करीत असताना उसाची संख्या नियंत्रणात करण्याचे शास्त्र हे पहिल्या दिवसापासूनच आत्मसात करणे आवश्यक असून याचे संपूर्ण नियोजन करूनच शेती करावी. सेंद्रिय, जैविक व रासायनिक खतांचे एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक असून ढोबळमानाने खते न टाकता अभ्यासपूर्वक खते देणे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने अधिक ऊस उत्पादनासाठी उसाची लागण ते ऊस तोडणीचे निश्चित धोरण ठरवण्यात यश आले तर शेतकरी व कारखाना यांच्यासाठी हे फायदेशीर ठरेल, असे मत व्ही. एस. आय. पुण्याचे माजी शास्त्रज्ञ डॉ. सुरेश माने पाटील यांनी व्यक्त केले.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कुन्नूर येथील हनुमान मंदिरात आयोजित ऊस पिक परिसंवादात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी शंकर ढंग होते.
या परिसंवादात डॉ. सुरेश माने पाटील यांनी ऊस पिकाच्या संदर्भात संपूर्ण अभ्यास करून उसाला समजून घ्यायचे आवाहन केले. तसेच कोणत्या जातीचे ऊस लावावे, कधी लावण करावे, दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुराची कमतरता भासत असल्यामुळे साडेचार ते पाच फूट सरी अंतराने ऊस लागण करून ऊस तोडणी मशीनने तोडणी करणे तंत्रज्ञान, औषधे, तणनाशके, खते, फवारणी, सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे प्रयत्न, आंतरपिके, मशागत, हराळी, लव्हाळा नियोजन, बेणे निवड, दुय्यम अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक खत, तण व्यवस्थापन, खोडवा शास्त्र, शेतामध्ये औजारे कधी चालवावी आधी सर्व विषयावर संपूर्ण मार्गदर्शन केले. माती परीक्षणानंतर तज्ञांच्या शिफारशीनुसार उसाच्या लागणीपासून काढणीपर्यंतचे नियोजन केले तर शेतकऱ्यांना शंभर टनाच्या वर उसाचे उत्पादन मिळू शकते हे प्रयोगांती सिद्ध झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, दत्त कारखान्याच्या वतीने पाने, पाणी व माती परीक्षण मोफत करून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चासत्रे, परिसंवाद, मेळावे, ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित करून तज्ञामार्फत मार्गदर्शन केले जात आहे. यामुळे कारखाना परिसरात शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढले असून त्यांच्यामध्ये आर्थिक संपन्नता आली असल्याचे सांगून कारखाना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दत्त कारखान्याचे संचालक शरदचंद्र पाठक यांनी सर्वांचे स्वागत केले. माती परीक्षण विभागप्रमुख ए. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बी. एस. मगदूम यांनी केले तर आभार हुपरी सेंटरचे विभागप्रमुख एस. डी. निंबाळकर यांनी मानले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्थक उत्तरे देण्यात आली.
यावेळी कारखाना संचालक इंद्रजीत पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, खरेदी विक्री संघाचे चेअरमन साताप्पा बागडी, धोंडीराम पाटील, आनंदा खोत, अशोक तावदारे, पिंटू पाटील, प्रमोद देसाई, आप्पासो चौगुले, अनिल निकम, शेखर माने, अशोक क्षीरसागर, बाळासो करडे, रघुनाथ पाटील, रावसाहेब गळतगे, महादेव कुलकर्णी, बाबासो पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा