आपत्तीवेळी मदतकार्य करणाऱ्या स्वयंसेवी सेवकांना अर्थसाहाय्य द्या कोल्हापूर जिल्हा आपत्ती निवारण एनजीओ समितीची मागणी

 


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

आपत्तीवेळी मदतकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि जवानांना अर्थसाहाय्य आणि सुविधा द्याव्यात, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आपत्ती निवारण एनजीओ समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.

पालकमंत्री मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, प्रत्येक वर्षी आपत्ती व्यवस्थापनात मदत करणाऱ्या एनजीओ व त्यांचे जवान यांना मानधनाचे प्रस्ताव पाठवले जातात; मात्र प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी होत नाही. दरवर्षी शासनाकडून जिल्ह्याला आपत्तीचा कोट्यवधीचा निधी येतो; मात्र या निधीमध्ये या घटकांसाठी तरतूद नाही, ही खेदाची बाब आहे. आपत्तीमध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या जवानांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा संरक्षण व इतर सुविधा मिळाव्यात. २००५ व २००६ मध्ये आलेल्यामहापुरावेळी मदतकार्य करणाऱ्या प्रत्येक एनजीओच्या जवानांना तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांच्या प्रयत्नातून होमगार्डच्या धर्तीवर व्हाईट आर्मी संस्थेच्या नावे मानधनाचा प्रस्ताव मिळवून आर्थिक मदत जिल्ह्यातील सर्व संस्थांच्या जवानांना मिळाली होती. त्याची पुन्हा अंमलबजावणी व्हावी. आपत्तीत सध्या काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे जवान हे कॉलेजचे शिक्षण घेत आहेत. भविष्यात या मदतकार्याचे त्यांना प्रशासनाच्या नोकरीची संधी म्हणून पोलिस होमगार्ड, आरोग्य विभाग, वन विभाग, अग्निशमनमध्ये प्राधान्य द्यावे.

समितीचे अध्यक्ष अशोक रोकडे, सुनील कांबळे, चंद्रकांत डोंगळे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री मुश्रीफ यांना भेटलेल्या शिष्टमंडळात शरद नारकर, अब्दुल सैफ पटेल, विनायक लांडगे, युवराज मोरे, गजानन सुतार, सुनील जाधव व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष