श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत महादबा पाटील महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात संपन्न
नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील समर्थ सद्गुरु महादबा पाटील (धुळगावकर) महाराज यांचा 42 वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. गेले पाच दिवस सुरू असणाऱ्या ज्ञानेश्वरी व गुरुचरित्र पारायणाची सांगता करण्यात आली. आज पहाटे पाच वाजता श्रींच्या मूर्तीवर 108 लिटर दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर कृष्णेच्या जलधारांनी मूर्तीस मंगलस्नान घालण्यात आले. श्रींच्या मूर्तीस महावस्त्र परिधान केल्यानंतर सकाळी ठीक सहा वाजून पाच मिनिटांनी समाधीच्या पुण्यकालादरम्यान मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पंचारती ओवाळल्यानंतर नामजपाने महापूजा संपन्न झाली. त्यानंतर दीपक केळकर यांची प्रवचन सेवा झाली.
दुपारी बारा वाजता श्रींच्या पालखीचा मुख्य दत्त मंदिरात प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला. ह.भ.प. संकेतबुवा काणे यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महादबा पाटील महाराज ट्रस्टकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी उत्स्फूर्तपणे शिबिरात सहभाग नोंदविला. दुपारच्या सत्रात विविध भजनी मंडळातर्फे सुमधुर संगीतसेवा संपन्न झाली. रात्री महाआरती व नामजप झाल्यानंतर उत्सव समाप्ती करण्यात आली. भाविकांच्या सहकार्याने आणि भक्तिपूर्ण वातावरणात हा उत्सव पार पडल्याची भावना ट्रस्टचे सचिव धनाजीराव जगदाळे यांनी व्यक्त केली. यावेळी विश्वस्त शांतादेवी डी. वाय. पाटील, विश्वस्त सदाशिव वरुटे, भाऊसाहेब भोसले, शुभांगी उपळावीकर, उमेश निकम आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा