धोका वाढला ; शिरोळ तालुक्यात स्थलांतर सुरूच
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून सतर्क राहण्याच्या सूचना
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
धरण क्षेत्रात सहज शिरोळ तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत जलद गतीने वाढ होत आहे. सध्या पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातूनही स्वयंचलित चार दरवाज्याच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने शिरोळ तालुक्याला धोका वाढला आहे. बुधवारपासून शिरोळ तालुक्यातील नदीकाठावर असणाऱ्या ग्रामस्थांसह जनावरांचे स्थलांतर सुरू असून आज गुरुवारी दिवसभरात संभाव्य पूरस्थितीचा धोका ओळखून अनेक नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले आहेत.
सध्या शिरोळ तालुक्यातील महत्त्वाचे रस्ते पुराच्या पाण्यामुळे ब्लॉक झाले आहेत गुरुवारी दिवसभरात कुरुंदवाड - नांदणी हा पूल तर दूधगंगा नदीवरील दानवाड - एकसंबा हा मोठा पूल पाण्याखाली गेला आहे. तर टाकवडे - इचलकरंजी हा प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
तालुक्यातील कुरुंदवाड शहरातील भैरववाडी गोठणपुर भागातील अनेक नागरिक स्थलांतरित होत आहेत. तर अकिवाट, टाकळी व राजापूर या गावातील नदीकाठावर असणारे ग्रामस्थ आपल्या जनावरांसमवेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. हेरवाड येथील अब्दुललाट मार्गा लागत असणाऱ्या सुतार वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने तेथील नागरिक व जनावरांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आले आहे. त्याचबरोबर वारणानदी काठावरील कवठेसार गावालाही पुराचा धोका बसला असून बहुतांशी नागरिक आपल्या जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर झाल्याचे समजते.
गुरुवारी दिवसभरात जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांनी शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कुरुंदवाड, हेरवाड, बस्तवाड आदी प्रमुख गावांची माहिती घेतली. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून योग्यवेळी स्थलांतराचा निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.
याबरोबर तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही तालुक्यातील विविध ठिकाणी पूरस्थितीची माहिती घेतली. राधानगरी धरणातून होणारा विसर्ग, सुरू असलेली पावसाची संततधार याचा धोका ओळखून अलमट्टी धरणातून ज्यादा क्युसेसने विसर्ग करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.
-------------
कुरुंदवाड एसटी आगाराचे स्थलांतर
महापुराचा धोका ओळखून कुरुंदवाड एसटी आगाराने कार्यालयातील महत्त्वाच्या साहित्यासह एसटी गाड्यांचे स्थलांतर जयसिंगपूर व इचलकरंजी डेपो या ठिकाणी करण्यात येत आहे. आगारातील सर्वच गाड्या शिरोळ दत्त कारखान्यावर घेण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख नामदेव पतंगे यांनी दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा