श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्त जनावरांसाठी चाऱ्याचे वाटप
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पूरग्रस्त जनावरांसाठी चाऱ्याचे वाटप करण्यात आले. प्रति जनावरांसाठी तीन दिवसाकरिता सहा मोळीचे वाटप करून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
श्री दत्त साखर कारखाना हा नेहमीच पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आला आहे. यावर्षी शिरोळ तालुका आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्याने आणि धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने कित्येक कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. त्याच पद्धतीने आपल्या जनावरांनाही निवारा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी सोडावे लागले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने चांगला चारा उपलब्ध करून देण्याची भूमिका श्री दत्त साखर कारखान्याने घेतली आहे.
शेतकरी, सभासद आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्न करणाऱ्या कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपत तेरवाड येथील ताळ बिरोबा देवळाजवळ, गट नंबर 436 मधील श्रीपती महादेव चव्हाण यांच्या 42 गुंठे शेतातील ऊस पूरग्रस्त जनावरांकरिता उपलब्ध करून दिला. पार्वती सूतगिरणी मध्ये कुरुंदवाड, हेरवाड, तेरवाड व इतर भागातील 272 जनावरे असून त्यांच्या चाऱ्याची सोय झाल्याने पूरग्रस्त नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रति जनावर सहा मोळी तीन दिवसासाठी देण्यात आला आहे. यामुळे तात्पुरता का होईना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे स्थलांतरित पूरग्रस्तांमधून दत्त कारखान्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. यावेळी कारखाना शेती मदतनीस विठ्ठल रजपूत, हसन सय्यद, तुकाराम वाळके, विनोद कुलकर्णी, शासकीय पशुधन अधिकारी प्रमोद झेंडे, गणेश चोथे, सुनील कोळी तसेच हेरवाड चे तलाठी श्री उपाध्ये, तेरवाड तलाठी एस. बी. कारंडे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा