प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावेत : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचना

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

सध्या धरण क्षेत्राबरोबर शिरोळ तालुक्यात पाऊस थांबला आहे. त्यामुळे पूर ओसरत चालला असून प्रशासनाने तातडीने पंचनाम्याची तयारी करावी, शेतकरी आणि जे पुरग्रस्त नागरिक आहेत त्यांच्या घराचे आणि शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात करावे, अशा सूचना आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत दिल्या.

यावेळी बोलताना आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, पूरस्थितीत ज्या - ज्या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा प्रत्येक गावातील रस्त्यांची उंची वाढवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करून त्याचा अहवाल तयार करावा.

सध्या पावसाने उसंत घेतल्याने पाणी पातळीत घट होत आहे. शिरोळ तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्याचबरोबर अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सरकार हे पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी असून लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. 

पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून टीमवर्क पद्धतीने ज्या - त्या गावातील पंचनामे तातडीने पूर्ण करून घ्यावेत. आरोग्य विभागाने पूर ओसरल्यानंतर तातडीने ज्या - त्या गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डास प्रतिबंधक औषध फवारणी, संसर्गजन्य रोगप्रतिबंधक औषधांचा साठा, सर्पदंश, त्वचारोग आदी औषधसाठे सज्ज ठेवून पूर ओसरल्यानंतर तालुक्यात कोणतीही रोगराई पसरू नये, याची काळजी घ्यावी. अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर, कृषी अधिकारी जांगडे, बांधकाम विभागाचे उप अभियंता बदडे, पाणीपुरवठा विभागाचे गवंडी, संजय नांदणे, संजय बोरगांवे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष