पुरग्रस्तांच्या प्राथमिक गरजांसह औषधसाठा सज्ज ठेवावा : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
सध्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुरप्रवण क्षेत्रातील काही नागरीक सुरक्षित स्थळी तसेच निवारा शेडमध्ये स्थलांतरीत होत आहेत. त्यांच्यासाठी राहण्याचे नियोजन करुन पाणी, जेवण यासह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. खाजगी कॉलेज आणि परिवहन महामंडळाने दळणवळणासाठी आपली वाहने ज्यादा इंधनासहित सज्ज ठेवावीत. स्थलांतरित जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन स्थानिक प्रशासनाने करुन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुकाक्यातील प्रशासनाला केल्या.
शिरोळ तहसिल कार्यालय येथे महापुरासंदर्भात आयोजीत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसिलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, नायब तहसिलदार योगेश जमदाडे, आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांच्यासह तालुक्यातील प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सूचना देताना आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यातील पूरप्रवण क्षेत्रातील नागरिक स्थलांतरीत होत आहेत. त्यांच्या राहण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी तातडीने हालचाली गतिमान कराव्यात, पावसाचा जोर वाढला तर स्थलांतरीत नागरीकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शासकीय पातळीवर नियोजित आराखड्यानुसार ज्या-ज्या ठिकाणी निवारा शेडची उभारणी करण्यात आली आहे, त्या ठिकाणी स्थानिक तलाठी, ग्रामसेवकांनी विशेष लक्ष देवून पुरग्रस्त नागरीकांचे नियोजन करावे, तसेच नेमणुकीच्या गावातच राहुन स्थलांतरित पुरग्रस्थांचे नियोजन करावे. पुढील परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना वेळोवेळी स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
शिरोळ तालुक्यातील आरोग्य विभागाच्या वतीने सर्पदंश, त्वचारोग यासह संसर्गजन्य आजाराचा धोका ओळखून औषध साठा सज्ज ठेवावा. त्याचबरोबर खाजगी कॉलेज आणि परिवहन महामंडळाच्या वतीने गाड्यांची सोय करण्यात यावी.
पुर काळात जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात त्यांना बांधण्याचे नियोजन आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या चार्याची सोय करण्यासाठी नियोजन लावण्यात यावे, यासह आपत्ती व्यवस्थापनच्या वतीने बोटींच्या माध्यमातून वारंवार पाहणी करुन सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात याव्यात. स्थानिक पातळीवर महापुराचा धोका ओळखून अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
दरम्यान, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शुक्रवारी दिवसभरात दत्तवाड, हेरवाड, घालवाड, चिंचवाड, शिरटी, हसुर, अर्जुनवाड , कनवाड आदी पूरप्रवण क्षेत्राला भेटी देऊन पहाणी केली व स्थानिक प्रशासनाला सूचनाही केल्या. यावेळी त्यांनी शुक्रवारी दिवसभरात पावसाने उघडीप दिली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजेही बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन केले.
यावेळी शिरोळ तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, बाबा पाटील, विजयसिंह माने देशमुख, संजय नांदणे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा