राज्यातील विविध शेतकरी संघटना एका झेंड्याखाली काम करणार : राजू शेट्टी
शेगांव / शिवार न्यूज नेटवर्क :
देशातील व राज्यातील शेतकरी , शेतमजूर व कामगारांना आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर ऊतरावे लागत आहे. स्वर्गीय शरद जोशी यांच्या विचाराने राज्यात आज विविध शेतकरी संघटना काम करत आहेत. शरद जोशी यांचे काम ,विचार व भुमिकेची अमंलबजावणी करण्यासाठी राज्यातील विविध शेतकरी संघटना एका झेंड्याखाली काम करणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेगांव येथे झालेल्या परिवर्तन आघाडीच्या मेळाव्यात बोलताना केले.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की परिवर्तन आघाडीकडून राज्यातील शेतकरी , शेतमजूर व कामगार यांच्या प्रश्नाबाबत एकत्रित येवून लढा ऊभारण्याचा निर्णय झाला. शासन व प्रशासनाकडून राज्यामध्ये कायद्याच्या नावाखाली अनेक काळे धंदे सुरू आहेत. राजरोसपणे कुंपनच शेत खाऊ लागले आहेत. शेतकरी , कामगार , विद्यार्थी व शेतमजूरांचे प्रश्न दिवसेंदिवस चिंताजनक बनू लागले आहेत.जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली संवेदनशील वक्तव्ये करून जाती धर्मामध्ये फूट पाडून सत्ता मिळविले जात आहे. एक आघाडी उद्योगपतींचे हितरक्षण करणारी तर दुसरी आघाडी शेती व्यवसायावरील बांडगुळांचे सरंक्षण करणारे लोक सत्तेमध्ये येत आहेत. सत्तेमध्ये गेल्यानंतर विरोधातील लोक सगळे प्रश्न विसरतात.
४ वर्षे ११ महिने शेतकरी , शेतमजूर , विद्यार्थी , कामगार , असंघटित कामगार यांच्यासाठी रस्त्यावरची लढाई लढायची व निवडणूक जवळ आल्यानंतर तिसरी आघाडी म्हणून युती व महाविकास आघाडीने बारसे घालण्याचे धंदे बंद करावेत. याऊलट जनतेच्या प्रश्नावर सातत्याने लढणा-या संघटना याच पहिल्या आघाडीचे दावेदार आहेत. ज्यांच्याकडे विचाराचे मूल्ये नाहीत त्यांनी मिडीया मॅनेज करून निवडणुकीच्या आधी दोन महिने जनतेला मुर्ख बनवित आहेत. यामुळे राज्यातील परिवर्तन आघाडी जनतेसमोर सक्षम पर्याय ठेवणार आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार वामनराव चटप हे होते.महाराष्ट्र राष्ट्र समितीचे अध्यक्ष मा. आमदार शंकर आण्णा धोंडगे , शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळ , विदर्भ पक्षाचे अध्यक्ष जयकुमार चौधरी , ज्येष्ठ नेते गजानन अहमदाबादकर , युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले , विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर , गजानन बंगाळे पाटील , किशोर ढगे , यांचेसह राज्याच्या विविध जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. यानंतर ४ सप्टेंबर रोजी नांदेड येथे परिवर्तन आघाडीचा दुसरा महामेळावा होणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा