पार्वती इंडस्ट्री इस्टेटने परिसरातील औद्योगिक प्रगतीला नवा वेग दिला : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :

शेतकऱ्याचा मुलगा उद्योजक व्हावा, या दृष्टिकोनातून ४३ वर्षांपूर्वी स्व. शामराव पाटील यांनी पार्वती इंडस्ट्रीजची स्थापना केली. त्यांचा ध्येयवाद आज फळाला आला असून, यड्राव येथे उभ्या असलेल्या पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्री इस्टेट लिमिटेडने परिसरातील औद्योगिक प्रगतीला नवा वेग दिला आहे. आज या औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे २५० ते ३५० उद्योग कार्यरत आहेत. शिरोळ तालुक्यातील अकिवाट आणि उदगाव या ठिकाणीही उद्योग उभारणीचा प्रयत्न सुरू आहे, ज्यामुळे तालुक्याचा औद्योगिक विकास अधिक गतीने होईल, असे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.

पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्री इस्टेट लिमिटेडची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. प्रारंभी स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी चेअरमन आमदार डॉ. पाटील यड्रावकर बोलत होते. त्यांनी शिरोळ तालुक्यातील उद्योगधंद्यांच्या विकासासाठी सोलर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा मानस व्यक्त केला.


सुमारे १३.५ कोटी रुपयांच्या निधीतून पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमधील सर्व रस्ते आणि सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या ७५% अनुदानाचा वापर करून या विकासकामांना चालना देण्यात आली आहे. यापुढे तीन वर्षे रस्ते देखभाल ठेकेदारांच्या ताब्यात राहणार असून उद्योजकांनीही सहभाग देऊन रस्त्यांचे टिकाव वाढवावा, असे आवाहन करण्यात आले.

पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले. उद्योगांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरातील बेरोजगारी दूर करण्यासाठी एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) उभारणीचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले. विशेषतः महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले, ज्याला सर्व सभासदांनी हात वर करून एकमताने मंजुरी दिली. सभेत चेअरमन आणि संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.

उद्योगांच्या प्रगतीचे दर्शन घडवताना गजानन सुलतानपुरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटला आता देशभरातील उद्योजक भेट देत आहेत. चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथे विजेचे प्रश्न आणि इतर सोयीसुविधा सोडवण्याचे कार्य होत असल्याचे सांगितले.

 यावेळी यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, व्हॉइस चेअरमन महावीर खवाटे, संचालक किरण बरगाले, महावीर पाटील, चंद्रकांत कांबळे, राहुल बंडगर, जैनुल बागवान, रत्नमाला गांधी , सुवर्णा पाटील, संजय बिडला यांच्यासह सर्व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक ताजुद्दीन तहसीलदार यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष