सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांचे पात्र महत्त्वाचे - चेअरमन अण्णासाहेब हवले
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
विद्यासागर शिक्षण संस्थेच्या अंतर्गत विविध कला व कौशल्यांच्या माध्यमातून आत्मसात केलेले शिक्षण भविष्यात उत्तम पद्धतीने इतरांना अध्यापन देण्यासाठी वापरल्यास सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्यास मोठी मदत होईल, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चेअरमन व कार्यक्रमाचे प्रमुख सन्माननीय अण्णासाहेब हवले यांनी केले. शिक्षकांचे योगदान देशाच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित 2023-2024 सालाच्या बीएड प्रशिक्षणार्थींच्या निरोप समारंभात ते मार्गदर्शन करत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक व संस्था संचालक मलगोंडा म्हैसाळे होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. बीएड प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन निरोप दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा प्रशिक्षणार्थी अध्यापकांनी सत्कार केला. विविध कलागुणांचे प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर केले.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या के.एस. पाटील हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक आर.एस. पचंडी आणि संचालक मलगोंडा म्हैसाळे यांनीही प्रशिक्षणार्थींना भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणार्थींनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत, शिक्षण संस्थेतील प्राध्यापकवृंदांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेने त्यांना अध्यापनासाठी योग्य कौशल्ये दिल्यामुळे संस्थेचे आणि शिक्षकांचे योगदान त्यांच्या जीवनात कायम महत्त्वाचे राहील, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
समारंभाला संचालक अनुज हवले, बाबासाहेब पाटील, सुकुमार चिप्रे, शिवाप्पा माळगे, रावसाहेब तेरदाळे, प्राचार्य डॉ. पुजारी, अजित हवले, नेमिनाथ बारवाडे, आनंद फिरगन्नावर, सौ. व्ही.के. थोरात यांच्यासह प्राध्यापक वृंद आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीबाई कांबळे यांनी केले, तर शेवटी आभार प्रदर्शन भुवनेश्वरी यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा