ऊसासाठी आंदोलनाचा भडका उडणार : उदगांवच्या यात्रेत भाकणूक
उदगांव / शिवार न्यूज नेटवर्क :
कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढणार, राज्यातील राजकारणात गोंधळ उडणार, परदेशात सुरू असलेल्या युध्दाचे सावट भारतावर उमटणार, जीवनावश्यक वस्तूंचा दर गगनाला भिडणार असल्याने गोर गरीबांचं जिणं मुश्किल होणार, कोल्हापूर जिल्ह्यात पाण्यासाठी वाद होणार, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा उफाळणार, येणारी पिके चांगली पिकून डौलणार, धन धान्याच्या राशी मोठ्या होणार मात्र शेतकर्याला दाम मिळणार नाही, ऊसासाठी आंदोलनाचा भडका उडणार अशी भाकणूक देवर्षी आण्णाप्पा पुजारी महाराज यांनी केली.
उदगांव (ता.शिरोळ) येथील श्री उदयसिध्द बिरदेव देवाची यात्रा बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. पहाटे अभिषेक, धार्मिक विधी करण्यात आले. दिवसभरात परिसरातील भाविकांबरोबर कर्नाटकातील भाविकांनी आपले नवस पुर्ण केले. उदयसिध्दांच्या नावानं चांगभलं... बिरोबाच्या नावानं चांगभलं...च्या गजरात भंडारा व खोबर्र्याची उधळण वालुगाच्या निनादात करण्यात आली.
उदगांव येथील पुरातन असलेल्या श्री उदयसिध्द बिरदेवाची यात्रा करण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून समस्त धनगर समाजाच्यावतीने नियोजन करण्यात आले होते. दसरा झाल्यानंतर पाचव्या दिवशी ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यात्रेनिमित्त परिसरासह कर्नाटकातील हजारो भाविक दाखल झाले होते. सकाळी धार्मिक विधी पुर्ण झाल्यानंतर श्री उदयसिध्द बिरदेवाची आकर्षक स्वरूपात पुजा बांधण्यात आली होती. दिवसभरात भंडारा व खोबर्याची उधळण केल्याने मंदिर परिसर पिवळाधमक झाला होता.
सायंकाळी वालूगाच्या वाद्यात मानकरी व कर्नाटकातील भाविकांनी हेडम व सबीना खेळला. यानंतर देवर्षी पुजारी यांच्यासह मानाच्या देवर्षींची भाकणूक झाली. त्यानंतर सायंकाळी 7 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत महाप्रसादासाठी प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, आज गुरुवारी सकाळी माळावरील मंदिरातून देव वालगाच्या वाद्यात गावातील मंदिरात आणण्यात येणार आहे. यात दिवसभरात ठिकठिकाणी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. व मोठ्याप्रमाणात भंडार्याची उधळण करण्यात आली. यात्रेमुळे मंदिर परिसराला सोन्याची झळाली आली होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा