आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उसळला जनसागर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या पाच वर्षात सर्व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न माझ्या हातून झाले आहे. प्रामुख्याने तालुक्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन तालुक्यात वैद्यकीय सेवा निर्माण केली आहे. या सर्व विकासकामांच्या माध्यमातून आजपर्यंत २ हजार कोटींची विकास कामे करण्यात मला यश आले. आणि त्याला आपल्या सर्वांची साथ मिळाली. यापुढेही शिरोळ तालुक्यातील जाती - पातीच्या राजकारणाला मूठमाती देण्यासाठी मला संधी द्यावी, असे प्रतिपादन राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
जयसिंगपूर येथील यड्रावकर लॉन येथे कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला, यावेळी आमदार बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, शिरोळ तालुक्यातील सर्वांगीण विकास साधत असताना सर्व समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपली जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी शेतकरी कर्जाच्या खाईत जात होता, हे लक्षात घेऊन शिरोळ तालुक्यात क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून घेतला आणि २० टक्के शेतकरी आणि ८० टक्के राज्यसरकार या धोरणानुसार शिरोळ तालुक्यातील शेती क्षारपडमुक्त होणार आहे. शिरोळ तालुक्यातील मुलांना क्रीडा विभागात वाव देण्यासाठी शिरोळ तालुक्यातील मोठ्या क्रीडांगणाचे काम पूर्ण होत आहे. याचबरोबर शिरोळ तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी तालुक्यातील पहिली एमआयडीसी निर्माण होत आहे. सर्व शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी यश मिळाले असून तालुक्यातील १ लाखाहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. याबरोबर शासनाच्या इतर विधवा परितक्त्या, ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजनेचा लाभ घेण्यात शिरोळ तालुका एक नंबरवर आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील सर्वांगीण विकास साधण्याचे भाग्य मला लाभले आहे. यापुढेही उर्वरित विकास कामांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही मला काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन यावेळी केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जयसिंगपूर शहरात उभा करण्याचे भाग्य मला मिळाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही दलित समाज बांधवांना विश्वासात घेऊन मीच उभारणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, शिरोळ तालुका हा महाराष्ट्रातला असा भाग आहे, जिथे विकास काय असतो, हे स्पष्टपणे दिसून येतं. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील सर्व भागांमध्ये, अगदी गल्लीबोळांपासून ते पाणंद रस्ते, शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा अशा प्रत्येक पातळीवर काम केलं आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जात, धर्म, किंवा वर्ग न बघता प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा काम केला आहे. त्यांचं नेतृत्व हिमालयासारखं आहे. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा अर्ज भरणं ही विजयी सभा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास एका नवीन उंचीवर पोहोचला आहे. त्यामुळे राजेंद्र पाटील म्हणजेच मी आमदार असे म्हणून त्यांना विजयी करावे, असे आवाहन केले.
यावेळी बोलताना संजय मंडलिक म्हणाले, आमदार डॉ. यड्रावकर यांनी शामराव पाटील अण्णांच्या कामांचा वारसा पुढे सुरु ठेवला आहे. इतका मोठा निधी तालुक्यात आणणारा आमदार म्हणून आमदार यड्रावकर यांच्याकडे पहावे लागेल, कोरोना काळात मंत्री असताना तळागाळात काम करून त्यांनी संपूर्ण राज्यात आपली लोकप्रियता वाढवली आहे. सर्व जाती - जमातींच्या सर्व सामान्य जनतेला न्याय देणारा आमदार असल्यामुळे त्यांच्या कामाला चालना देण्यासाठी १ लाखाच्या लिडने निवडून देवूया, असे आवाहन यांनी केले. यावेळी अमरसिंह माने पाटील यांनी स्वागत केले. यावेळी दिग्वीजय माने, सचिन देशिंगे, रुस्तूम मुजावार, रेखा राजमाने यांची मनोगते झाले.
यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवडणूक लढवण्यासाठी राजू ठोंबरे उमळवाड ५१ हजार, भालचंद्र कागले ११ हजार रुपये निवडणूक लढविण्यासाठी मदत म्हणून देण्यात आली. तसेच मागासवर्गीय मित्र मंडळ यांच्याकडून १० हजार रुपये डिपॉझिट भरण्यासाठी देण्यात आले. या संवाद मेळाव्यात पी.एम. पाटील, प्रकाश पाटील टाकवडेकर, इचलकरंजीचे रविंद्र माने, उद्योगपती विनोद घोडावत, सुभाषसिंग रजपूत, बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित पाटील, दशरथ काळे, विश्वास बलिघाटे, सईद पटेल, दादासो पाटील, शाहिन मोमीन, दादेपाशा पटेल, मल्लाप्पा चौगुले, सतिश मलमे, रमेश भुजूगडे, चंद्रकांत जोंग, जयपाल कुंभोजे, मिलिंद शिंदे, मुनिर शेख, शाबगोंडा पाटील, फारूक जमादार, इकबाल मेस्त्री, राकेश खोंद्रे, सुरेश शहापुरे, गुरुदत्तचे संचालक बबन चौगुले, पंचगंगेचे संचालक जयपाल कुंभोजे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा