बेकायदेशीर हत्यारे विक्री करणाऱ्या आरोपीस अटक; १ लाख ५१ हजारांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त

 


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेनंतर अवैध हत्यारे बाळगणारे आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा आदेश दिल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कृष्णा सुरेश कलकुटकी (38) या इसमाला बेकायदेशीर हत्यारे विक्री करताना अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1 गावठी पिस्टल, 3 जीवंत राऊंड आणि अॅक्टीव्हा मोपेड असा एकूण 1,51,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कोल्हापूरचे मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित यांनी विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे, विक्री करणारे तसेच तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेतील अधिकारी आणि अंमलदारांची वेगवेगळी पथके तयार करून अशा गुन्ह्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

आज, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कृष्णा सुरेश कलकुटकी, रा. खुपीरे, ता. करवीर, हा व्यक्ती वीटभट्टी, दोनवडे फाटा, ता. करवीर येथे बेकायदेशीर पिस्टल व राऊंड विक्रीसाठी येणार आहे. या खात्रीशीर माहितीनुसार, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांनी पथक तयार करून कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार, दोनवडे फाटा ते साबळेवाडी रोडवरील वीटभट्टीजवळ सापळा रचला गेला.

सापळ्यादरम्यान, कृष्णा सुरेश कलकुटकी यास ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे 1 गावठी बनावटीचे पिस्टल, 3 जीवंत राऊंड आणि अॅक्टीव्हा मोपेड असा एकूण 1,51,500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत आहे.

ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे आणि त्यांचे पथक - पोलीस अंमलदार संतोष बरगे, गजानन गुरव, सागर चौगले, वैभव पाटील, प्रविण पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, कृष्णात पिंगळे, नामदेव यादव, राजू येडगे - यांनी पार पाडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष