श्री बुवाफन महाराज महाअभिषेक व गंधरात्र सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूसास सोमवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी श्री बुवाफन महाराज मंदिरातील समाधीस्थळी महापूजा करून महाअभिषेक अर्पण करण्यात आला. रात्री श्री बुवाफन महाराज समाधीस गंध लावून मानाचा गलिफ अर्पण करण्याचा गंधरात्र सोहळा अमाप उत्साहात संपन्न झाला.
उत्सव व उरुसानिमित्त आयोजित महिला व पुरुष गटातील रांगोळी स्पर्धा, गाव मर्यादित दुहेरी कॅरम स्पर्धा, व्हाॅलीबॉल स्पर्धा, मोटर सायकलबरोबर रेडकू पळवणे, मोटरसायकलबरोबर म्हैस पळवणे या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
श्री बुवाफन महाराज मंदिरात सकाळी मंदिराचे पुजारी राजशेखर हिरेमठ, अशोक हिरेमठ, महंतय्या हिरेमठ, अमोल हिरेमठ यांच्यासह हिरेमठ स्वामी परिवारातील सर्व सदस्य वीरशैव लिंगायत माळी समाज आणि बुवाफन महाराज भक्तगणाच्या उपस्थितीत, समाधी स्थळी महापूजा व महाअभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. श्री बुवाफन महाराज की जय श्री बुवाफन महाराज की दोस्तांनो धिन च्या जयघोषात हा धार्मिक सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला
सोमवारी रात्री श्री बुवाफन महाराज मंदिराचे पुजारी हिरेमठ स्वामी, गावातील प्रमुख मानकरी, दिवटीचे मानकरी वीरशैव लिंगायत माळी समाज, आणि श्री बुवाफन महाराज भक्तगण यांच्या उपस्थितीत श्री बुवाफन महाराज समाधीस गंध लावून मानाचा गलिफ अर्पण करण्यात आला. यावेळी पारंपरिक वाद्याच्या गजरात मानाच्या गलिफाची मिरवणूक काढण्यात आली. श्री बुवाफ महाराज की जय. श्री बुवाफन महाराज की दोस्तारो धिनचा अखंड जयघोष करीत भाविकांनी समाधी स्थळाचे दर्शन घेतले. रात्रीपासूनच अनेक श्री बुवाफन महाराज भक्तगणांनी दंडवत घालून नवस पूर्ण करत समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
रात्री येथील श्री पद्माराजे विद्यालयाच्या मानधने क्रीडांगणावर सुभाष हिलगे निर्मित ऑर्केस्ट्रा वैभव यांचा मनोरंजनात्मक व करमणुकीचा बहारदार कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीचे मार्गदर्शक युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव, अध्यक्ष केतन चव्हाण, उपाध्यक्ष संकेत कोळी, कार्याध्यक्ष महेश काळे, यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उत्सव आणि उरूस साजरा करण्याकरिता विशेष परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा