रुई स्टील इंडियामुळे शाहू इंडस्ट्रीच्या नावलौकिकत भर : अशोकराव माने
वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
शाहू इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून रुई स्टील इंडिया कंपनीने इंडस्ट्रीचे नावलौकिक वाढवले आहे. त्यांचे कार्य करण्याची शैली प्रभावशाली असून कामगार व कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा विरंगुळा मिळावा म्हणून राबविण्यात आलेले उपक्रम आदर्शवत आहेत. त्यांच्या या उपक्रमाने राज्यातच नव्हे तर देशात शाहू इंडस्ट्रीजचा सन्मान वाढला आहे, असे प्रतिपादन हातकलंगलेचे आमदार दलितमित्र अशोकराव माने यांनी केले.
मौजे आगर (ता. शिरोळ) येथील शाहू इंडस्ट्रीज येथे रुई स्टील इंडिया कंपनीच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आ. माने बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक सुभाष बाबर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रुई स्टील इंडियाचे हर्षवर्धन फडणीस म्हणाले, गेल्या दहा वर्षापासून कामगार व कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवला जातो. वर्षातून एकदा वेगळेपणा मिळावा व विरंगुळा व्हावा यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते व त्यांना बक्षिसे देण्यात येतात. यामध्ये बॅडमिंटन, बुद्धिबळ, संगीत खुर्ची, रांगोळी, क्रिकेट, खाद्य स्पर्धा असे उपक्रम राबवले जातात. यावेळी सौ. पल्लवी फडणीस, नंदकुमार बलदवा, राम बोंडगे, जयदीप शेट्टी, आर एस कुलकर्णी, विनेश खाडे, लक्ष्मी फॉड्री कुपवाडचे यश शहा त्यांच्यासह कर्मचारी व कामगार उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन विकास माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा