क्रीडा आणि संस्कृतीच्या संगमातून समाजाला दिशा मिळते : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

जयसिंगपूर येथे कोल्हापूर जिल्हा वार्षिक क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 क्रीडा स्पर्धा ही व्यक्तीच्या सुप्त गुणांना वाव देणारी एक प्रभावी साधन आहे. त्यातून केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर मानसिक विकासही घडतो. आजच्या आधुनिक युगात क्रीडा आणि पारंपारिक खेळ हे समाजाला नवीन दिशा देण्याचे साधन बनले आहेत. नगरविकास विभाग कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे केलेले आयोजन ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

नगरविकास विभाग, कोल्हापूर जिल्हा वार्षिक क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते येथील दसरा स्टेडियमवर मोठ्या उत्साहात पार पडले, यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते.

आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, क्रीडा ही समाजाच्या आरोग्यपूर्ण विकासासाठी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे आपल्या लोकपरंपरेला पूरक असे वातावरण तयार होते. त्यामुळे अशा उपक्रमांमुळे नवीन पिढीला आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलता येतो. कोल्हापूर जिल्हा क्रीडा स्पर्धा ही फक्त खेळांपुरती मर्यादित नसून, ती आपल्या संस्कृतीला वृद्धिंगत करण्यासाठीही महत्त्वाची आहे.

यड्रावकर म्हणाले, जगाच्या पाठीवर कोठेही गेलात तरी भारतीय क्रीडा आणि संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. आपण आपल्या जिल्ह्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना उजाळा दिला, तर कोल्हापूरचे नाव क्रीडा क्षेत्रात उच्च पातळीवर झळकेल, ही जबाबदारी आपण सर्वांनी मिळून उचलली पाहिजे. असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपआयुक्त प्रसाद काटकर, नागेंद्र मुतकेकर, माजी मुख्याधिकारी संजय गायकवाड, माजी नगरसेवक राजेंद्र झेले, राहुल बंडगर व कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिकांचे सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष