हजरत दौलत शहावली दर्गा व श्री काळाराम मंदिराला 'क' वर्गाचा दर्जा : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाडचे ग्रामदैवत असलेल्या हजरत दौलत शहावली दर्गा व नाशिक नंतर कुरुंदवाड मधील पुरातन मंदिर असलेल्या श्री काळाराम मंदिराला 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असून या माध्यमातून दोन्ही श्रद्धास्थानाचा विकास साधला जाणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
कुरुंदवाड शहराचे ग्रामदैवत हजरत दौलत शहावली दर्गा हा प्रसिद्ध आहे. या दर्ग्याचा उरूस मोठ्या उत्साहात भरतो, त्यामुळे या दर्ग्याला मोठे महत्त्व प्राप्त आहे. सदरचा दर्गा हा तीर्थक्षेत्र दर्जात नसल्याने दर्गा व दर्गा परिसराचा विकास करण्यासाठी म्हणावा तेवढा निधी खर्च होत नव्हता, अखेर या दर्ग्याला 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने मोठ्या प्रमाणात निधी आणून दर्गा व दर्गा परिसराचा विकास साधला जाणार आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक नंतर पुरातन असलेल्या कुरुंदवाड येथील श्री काळाराम मंदिराचे महत्त्व मोठे आहे. कुरुंदवाड शहरातील सर्वात ऐतिहासिक मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मंदिर व मंदिर परिसराचा विकास होणे गरजेचे होते त्यासाठी या मंदिराला देखील 'क' वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने मंदिराचा विकास होणार असल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.
कुरुंदवाड शहरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण, विविध समाज हॉल बांधकाम, रस्ते, स्ट्रीट लाईट यासह विविध विकास कामांसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. मात्र, तीर्थक्षेत्रासाठी शहराला निधीची कमतरता होती. हजरत दौलत शहावली दर्गा व श्री काळाराम मंदिराला 'क' वर्गाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे श्रद्धास्थानाचा विकास देखील होणार आहे. त्यामुळे कुरुंदवाड शहराचा चौफेर विकास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर कुरुंदवाड शहराच्या विकासासाठी यापुढे निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा