वृद्ध महिलेला फसवणूक करून चोरी करणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर जिल्ह्यात वृद्ध महिलेस नजरबंदीचा बनाव करून फसवणूक करणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात 68,950 रुपये किंमतीची सोन्याची चेन आणि 1,00,000 रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण 1.68 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाच्या सूचना दिल्या होत्या. तपास पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत दाखल गुन्ह्यातील संशयित ताराराणी चौक ते तावडे हॉटेल रोड परिसरात येणार असल्याचे समजल्यावर सापळा रचून दोघांना पकडले.

तपासादरम्यान, या विधीसंघर्षग्रस्त बालकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 9.850 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. संशयित बालकांना मुद्देमालासह शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष